Join us  

‘गुड्डन’ मालिकेत दिसणार सगळ्यात तरुण सासूबाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 4:17 PM

टीव्हीवर प्रथमच सासू आणि सुनेच्या पारंपरिक भूमिकेची अदलाबदल झालेली पाहायला मिळणार आहे. 20 वर्षांची गुड्डन आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या चक्क तीन मुलींची सासू बनते.

ठळक मुद्देगुड्डनमध्ये 20 वर्षांच्या मुलीची कथा दाखवण्यात येणार आहे

‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ ही नवी मालिका ‘झी टीव्ही’वरून लवकरच प्रसारित होत आहे. गुड्डन या 20 वर्षांच्या मुलीची कथा हलक्याफुलक्या शैलीत सादर करण्यात आली आहे.  ही 20 वर्षांची गुड्डन आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या चक्क तीन मुलींची सासू बनते! टीव्हीवर प्रथमच सासू आणि सुनेच्या पारंपरिक भूमिकेची अदलाबदल झालेली पाहायला मिळणार आहे. या तीन सुना आपल्या 40 वर्षांच्या सासरेबुवांसाठी सुयोग्य पत्नीचा शोध घेतात आणि आपले हितसंबंध जपण्यासाठी 20 वर्षांच्या गुड्ड्नशी त्यांचे लग्न लावून देतात. या तिन्ही सुनांचेच अधिराज्य असलेल्या घरात सासू म्हणून प्रवेश केलेली 20 वर्षांची गुड्डन पूर्ण भांबावून जाते; कारण या सुना तिला येता-जाता तिरकस टिप्पणी करून नाउमेद करीत असतात. शिवाय “तुमसे ना हो पाएगा!”  असे तिला सतत हिणवून दाखवतात  ज्यामुळे तिच्या  आत्मविश्वासाचे अजूनच खच्ची करणे होते. आपल्या घरच्यांकडून होत असलेल्या या असहकारावर आणि सुनांच्या उघड आव्हानांवर मात करून गुड्डन आपल्यातील क्षमता ओळखून आत्मविश्वासाने दैनंदिन समस्यांना सामोरी जाण्यास शिकेल काय? येत्या 3 सप्टेंबर रोजी या मालिकेच्या प्रसारणास प्रारंभ झी टीव्हीवर होणार आहे. 

आपल्या व्यक्तिरेखेबाबत कनिका मान म्हणाली, “गुड्डन आणि माझ्या स्वभावात अनेक गोष्टी समान आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात गुड्डनला ज्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं, त्यांच्याशी मी पूर्ण परिचित आहे. शाळा असो, कॉलेज असो, कामाचं ठिकाण असो की सामाजिक समारंभ असो, तुमच्यातील दोष दाखवून त्यावर टीका करणारे लोक तुम्हाला सगळीकडे भेटतात. पण त्यांचं बोलणं आपण मनावर घ्यायचं नसतं आणि त्यांच्या निर्णयामुळे आपल्यावरीलआत्मविश्वास गमावून बसायचा नसतो. असामान्य गोष्ट साध्य करण्याचा गुड्डनचा कठोर निर्धारच तिला आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण करतो. मालिकेत नायिकेची मध्यवर्ती भूमिका मी प्रथमच साकारीत असून माझ्या कारकीर्दीचा प्रारंभ करण्यासाठी मला गुड्डनपेक्षा अधिक चांगली मालिका मिळणं शक्यच नव्हतं. प्रेक्षकांना मी गुड्डनच्या भूमिकेत पसंत पडेन आणि त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळविण्यात मी यशस्वी होईन, याची मला खात्री वाटते.” 

‘गुड्ड्न… तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेत श्वेता महाडिक, दलजित सौंध, सेरिश अली, मायंक वर्मा आणि रेहन रॉय हे नामवंत कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारतील.