Join us  

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील चिन्याचे वडीलदेखील आहेत अभिनेते, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 9:00 AM

फार कमी लोकांना माहित आहे की अर्णव राजेचे वडीलदेखील अभिनेता आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला'ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. लवकरच या मालिकेत ओम आणि स्वीटूच्या लग्नाची लगबग पहायला मिळणार आहे. ओम, स्वीटू, शकू, नलू , दादा, मालविका या मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेतील चिन्याच्या भूमिकेलाही चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. नेहमी ओम आणि स्वीटूच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या चिन्याची भूमिका साकारली आहे अभिनेता अर्णव राजेने. फार कमी लोकांना माहित आहे की अर्णव राजेचे वडीलदेखील अभिनेता आहे.

शाळेत असल्यापासूनच अर्णवला अभिनयाची आवड होती. त्यामुळे बालपणीच त्याने नाट्य अभिनय कार्यशाळेत सहभाग दर्शवून अभिनयाचे बारकावे शिकण्यास सुरुवात केली. अर्णवचे वडील जयेश राजे हे देखील अभिनय क्षेत्रातच कार्यरत आहेत आणि घरातूनच त्याला अभिनयाचे मार्गदर्शन मिळत गेले. जयेश राजे यांनी काही लघुपटात काम केले आहे तर ‘रेस्ट इन पीस’ या सीरिजमध्येदेखील काम केले आहे.

२०१९ मध्ये अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिव्हल आयोजित केले होते या फेस्टिव्हलच्या सादरीकरणात जयेश राजे यांनी लघुपटातून मार्गदर्शन केले होते. माझे वडीलच माझ्यासाठी अभिनयातले पहिले गुरू आहेत असे तो सांगतो.

पुढे देवेंद्र पेम यांच्या अभिनय कार्यशाळेत देखील त्याने अभिनयाचे धडे गिरवले. रुपारेल कॉलेजमध्ये असताना नाटकांतून विविधांगी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यातून अनेक नाट्य स्पर्धा गाजवल्या. ‘भाग धन्नो भाग’ ही लोकप्रिय एकांकिका सादर करत असताना सुवर्णा राणे यांनी अर्णवला हेरले. सुवर्णा राणे या येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. आम्हाला जसा चिन्या हवा आहे अगदी तसाच तू आहे असे मत सुवर्णा राणे यांनी अर्णवच्याबाबतीत सांगितले होते. अशा प्रकारे चिन्याच्या पात्रासाठी अर्णवची निवड करण्यात आली.

पदार्पणातच अर्णवला झी मराठी वाहिनीसारखा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. मालिकेतून त्याने साकारलेला चिन्या प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. 

टॅग्स :झी मराठी