Join us  

'स्त्री शिक्षणाने राष्ट्राचीही होते प्रगती', राजेश शृंगारपुरेने सांगितले स्त्री शिक्षणाचे महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 8:57 PM

अभिनेता राजेश श्रृंगारपुरे सध्या पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेत अहिल्याबाईंच्या सासर्‍यांची, मल्हारराव होळकरांची भूमिका साकारतो आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेची कहाणी १८ व्या शतकातील आहे आणि ही एका अशा स्त्रीची कहाणी आहे, जिचे विचार काळाच्या पुढचे होते आणि तिला तिच्या सासर्‍यांची निरंतर साथ होती. ज्या काळात सामाजिक रूढी आणि पितृप्रधान समाजरचनेचा जीवनावर खूप पगडा होता, शिक्षण स्त्रियांसाठी निषिद्ध होते, किंबहुना स्त्रियांना स्वतःचा आवाज किंवा अधिकारच नव्हते, अशा काळात अहिल्याबाई यांनी याचे ठळक उदाहरण सादर केले की माणूस जन्माने किंवा तो स्त्री किंवा पुरुष असल्याने नाही; तर त्याच्या कर्तृत्त्वाने महान होतो.

या मालिकेत टीव्ही अभिनेता राजेश शृंगारपुरे अहिल्याबाईंच्या सासर्‍यांची, मल्हारराव होळकरांची भूमिका करत आहे. सर्वांसाठी शिक्षण आणि समानता या बाबतीत राजेश शृंगारपुरे यांची ठाम मते आहेत. सध्याच्या कथानकात देखील अहिल्याबाईंची शिकण्याची तळमळ आणि शिक्षणाचे महत्त्व दाखवले आहे.

याबद्दल राजेश शृंगारपुरे म्हणाला, “‘जेव्हा तुम्ही एका स्त्रीला शिक्षित करता, तेव्हा तुम्ही एका देशाला शिक्षित करत असता’ या सूत्रावर माझा ठाम विश्वास आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या चळवळीत दाखल होताना स्त्रियांसाठी शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. स्त्रियांना शिक्षण दिल्याने केवळ एका व्यक्तीचा कायापालट होत नाही तर त्यांचे कुटुंब, समाज आणि अगदी राष्ट्राचीही उन्नती होते. एकदा आपल्याला स्त्री शिक्षणाचा होणारा हा बहुआयामी परिमाण लक्षात आला, की मगच आपल्याला हे उमगेल की, जेव्हा स्त्रिया संपूर्णपणे सक्षम होतील, तेव्हाच आपला समाज पूर्णपणे सक्षम होऊ शकेल. मल्हाररावांनी अहिल्येची ज्ञानाची भूक ओळखली आणि ती त्यांनी १८व्या शतकातील सामाजिक नियमांना फाटा देऊन पूर्ण केली आणि नकळत तिला माळवाची साम्राज्ञी बनवण्यासाठी तयार केले, हे बघणे नक्कीच खूप प्रेरणादायक असेल.”

 

टॅग्स :राजेश श्रृंगारपुरे