‘गणपती बाप्पा मोरया’ मालिकेत रिद्धी आणि सिद्धीला पार्वतीची पसंती मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 16:16 IST
गणपती बाप्पा म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं दैवत. कोणाला त्याच्या देवत्वाची प्रचिती येते तर कोणाला दिव्यत्वाची, कोणाला तो आपला मित्र वाटतो, ...
‘गणपती बाप्पा मोरया’ मालिकेत रिद्धी आणि सिद्धीला पार्वतीची पसंती मिळणार?
गणपती बाप्पा म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं दैवत. कोणाला त्याच्या देवत्वाची प्रचिती येते तर कोणाला दिव्यत्वाची, कोणाला तो आपला मित्र वाटतो, तर कोणाला मार्गदर्शक. गणपती बाप्पा मोरया या मालिकेमध्ये गणेशाच्या आयुष्यातील आणखी एक वेगळी बाजू प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. गणपतीच्या आयुष्यात रिद्धी आणि सिद्धीचे आगमन झाले आहे. पण आता गणेशाचे प्रापंचिक जीवन कसे सुरू होणार? यामध्ये किती अडथळे येणार? रिद्धी आणि सिद्धीच्या मार्गात येणारे अडथळे त्या कशा दूर करणार? हे बघणे रंजक असणार आहे. तसेच प्रेक्षकांना मालिकेमध्ये अष्टविनायकाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.रिद्धी आणि सिद्धीला अद्याप माहिती नाही की त्या ब्रम्हकन्या आहेत. पण त्यांना आदिशक्तीने असा दृष्टांत दिला आहे की तुम्हाला गणेशाचे दर्शन घ्यावे लागणार आहे आणि त्यातूनच तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांचे निरसन होणार आहे. रिद्धी आणि सिद्धी त्या दृष्टांताला लक्षात ठेवून अष्टविनायकाच्या दर्शनास प्रारंभ केला आहे, त्यांना या प्रवासामध्ये अनेक अडथळे येत आहेत पण त्यांच्या नकळतच बाप्पा हे अडथळे दूर करत आहे. याच परीक्षांना आणि अडथळ्याना सामोरे जात असताना आणि अष्टविनायकाचे दर्शन घेत असतानाच त्यांना कळणार आहेत की त्या ब्रम्हकन्या आहेत. परंतु याच दरम्यान इंद्राची पत्नी सची रिद्धी आणि सिद्धीबद्दल बऱ्याच गोष्टी पार्वतीला सांगते. त्यामुळे पार्वतीच्या मनामध्ये असलेली रिद्धी आणि सिद्धीबद्दलची चांगली मते कुठेतरी ढळमळीत होऊ लागतात. अष्टविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर जेव्हा गणपती बाप्पा या दोघींना कैलासावर घेऊन येतात, तेव्हा पार्वती या दोघींना स्वीकारेल की त्यांना कैलासावरून परत जायला सांगेल, हे बघणे रंजक ठरणार आहे.पार्वती रिद्धी आणि सिद्धीला सून म्हणून स्वीकारणार की रिद्धी आणि सिद्धीला गणेशासोबत प्रापंचिक जीवन सुरु करण्यासाठी अजून किती परीक्षा आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागणार हे लवकरच प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळेल.