लग्नाची तयारी सेटवरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 17:46 IST
विवेक दहिया कवच... काली शक्तियों से या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत विवेक प्रमुख भूमिका साकारत असल्याने या ...
लग्नाची तयारी सेटवरच
विवेक दहिया कवच... काली शक्तियों से या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत विवेक प्रमुख भूमिका साकारत असल्याने या मालिकेच्या चित्रीकरणासाठी विवेकला सध्या अधिकाधिक वेळ द्यावा लागत आहे. विवेक पुढील महिन्यात अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने लग्नाची तयारी करायला त्याच्याकडे वेळच नाहीये. त्यामुळे लग्नाच्या कपड्यांची शॉपिंग त्यांचे कुटुंबीयच करत आहेत आणि त्याची ट्रायल विवेक सेटवरच करत आहे. विवेक लग्नासाठी जितका उत्सुक आहे, तितकाच तो त्याच्या नव्या मालिकेसाठीदेखील आहे. कारण विवेक पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेद्वारे त्याच्या कारकिर्दीला खऱया अर्थाने सुरुवात झाली असल्याचे त्याचे म्हणणे आहे. या मालिकेत तो एका व्यवसायिकाची भूमिका साकारत आहे. हा व्यवसायिक त्याच्या पत्नीवर जीवापाड प्रेम करतो. पण एका मुलीला हा आवडायला लागतो. काहीही करून त्याला आपले प्रेम स्वीकारायला लावायचे असे ती मुलगी ठरवते. या मुलीकडे काही अद्भूत शक्ती असतात. त्याद्वारे ती त्याला मिळवण्याचा प्रयत्न करते. पण या सगळ्यात त्याची पत्नी त्याचे कवच बनते अशी या मालिकेची कथा आहे. विवेक स्वतः कोणत्याही अद्भूत शक्तींवर विश्वास ठेवत नाही. पण अद्भूत शक्ती असतात असे त्याने अनेकांकडून ऐकलेले आहे. पण जोपर्यंत स्वतः कोणतीही गोष्ट पाहात नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवता येत नाही असे त्याचे म्हणणे आहे. बालाजी प्रोडक्शनसोबत विवेकची ही तिसरी मालिका आहे. विवेक मुंबईत अभिनेता बनायला आला, त्यावेळी चित्रपटात काम न करता मालिकेत काम करायचे आणि बालाजी प्रोडक्शनसोबत एकतरी मालिका करायची असे त्याने ठरवले होते. त्याचे हे स्वप्न इंडस्ट्रीत आल्यावर लगेचच पूर्ण झाले आणि त्यातही बालाजीसोबत इतक्या मालिका करायला मिळाल्या याचा आनंद आहे असे विवेक सांगतो. या मालिकेत त्याच्यासोबतच मोना सिंग आणि महेक चहलही प्रमुख भूमिका साकारणार आहेत.