Join us

​विवेक दहिया सांगतोय, त्या जंगलातून जाताना आमच्यामागे धावत आले होते कोणीतरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 15:47 IST

विवेक दहियाने ये है मोहोब्बते या मालिकेत साकारलेली भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली. आता तो बालाजी प्रोडक्शनच्या आगामी मालिकेत दिसणार ...

विवेक दहियाने ये है मोहोब्बते या मालिकेत साकारलेली भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली. आता तो बालाजी प्रोडक्शनच्या आगामी मालिकेत दिसणार आहे. कयामत की रात या मालिकेत तो झळकणार असून या मालिकेतील त्याचा लूक हा खूपच वेगळा असणार आहे. त्याच्या या लूकबद्दल सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हा लूक प्रेक्षकांना अतिशय आवडला असून विवेक दहिया या मालिकेच्या चित्रीकरणात सध्या चांगलाच व्यग्र आहे. या मालिकेचे चित्रीकरण तो देशातील विभिन्न ठिकाणी करणार आहे. हा शो एक फँटसी थ्रिलर असून या शोमधून सर्वांत भयंकर दुष्टशक्ती टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे चित्राकरण करत असताना त्याला नुकतीच त्याच्या आयुष्यात घडलेली एक भय कथा आठवली. याविषयी तो सांगतो, आपण सगळेच मस्करी करतो आणि बहुतेकदा त्याचा शेवट हास्याने व्हावा असे सगळ्यांना वाटत असते. पण माझ्या मस्करीची कुस्करी झाली होती. माझ्या युनिव्हर्सिटीच्या दिवसांमध्ये मला आठवतंय मी कार्डिफ येथील माझ्या काही मित्रांसोबत नेहमीच मस्करी करायचो. एकदा आम्ही रात्री दोन वाजता ड्राईव्हसाठी गेलो. आम्ही एका जंगलातून जात होतो आणि तो नो एंट्री झोन होता. त्यांना घाबरवण्यासाठी मी त्यांना सांगितले की, त्या क्षेत्रामध्ये काही पर्यटक गेले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे मृतदेह लटकलेले दिसले. पण तेव्हाच खरोखर आमची गाडी जंगलात बंद पडली आणि अखेर जेव्हा ती चालू झाली तेव्हा आम्हाला असं जाणवलं की, कोणीतरी आमचा पाठलाग करत आहे. आम्ही ४०-५० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गाडी चालवत होतो आणि जेव्हा मी गाडीच्या आरशातून पाहिले तेव्हा मी कोणालातरी आमचा पाठलाग करताना पाहिले, पण त्यानंतर जेव्हा मी मागे वळून पाहिले तेव्हा मागे कोणीच नव्हते. माझ्या मित्रालाही आमच्या गाडीच्या बाजूच्या समांतर कोणीतरी पळताना दिसत होते. आम्हाला तर धक्काच बसला. बाप रे… माझ्या आयुष्यातील ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. कयामत की रात या मालिकेमुळे मला माझ्या आयुष्यातील तो अनुभव सध्या सतत आठवत आहे.Also Read : ​ये है मोहोब्बते फेम दिव्यांका त्रिपाठी या कारणामुळे फुकेटला झाली रवाना