Join us

विनायक माळीची छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 14:08 IST

Vinayak Mali : माझी माणसं या मालिकेतून विनायक माळीचे छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली आहे.

सन मराठी वाहिनीवरील माझी माणसं या मालिकेत हर्षदा आणि विघ्नेशच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. दोन दिवसांपूर्वीच या दोघांच्या हळदीचा समारंभ पार पडला त्यावेळी बिग बॉस फेम दादूसने त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी दादूसने हळदीचे गाणं म्हटले होते. हर्षदाचे लग्न होण्यासाठी गिरीजा अनेक संकटांना तोंड देत आहे. येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर ती यशस्वीपणे मात करत आहे. हर्षदाच्या लग्नासाठी तिने पैशांची जुळवाजुळव केली. मात्र आता या लग्नात आणखी एक विघ्न आलेले पाहायला मिळणार आहे. 

विघ्नेशने आपल्या मुलीला फसवलं तो हर्षदासोबत लग्न करतोय हे पाहून नेहाचे वडील त्याला भर मंडवात त्याला हर्षदासोबत लग्न करण्यापासून थांबवतात आणि नेहाच्या पोटातील बाळ विघ्नेशचे आहे याचा खुलासा करतात. मात्र तेवढ्यात नेहाच्या पोटात असलेल्या बाळाची जबाबदारी घेणारा व्यक्ती तिथे येतो. या सर्व प्रकरणाचा उलगडा करतो. हा व्यक्ती म्हणजेच सर्वांचा लाडका दादूस म्हणजेच सोशल मीडिया स्टार विनायक माळी आहे. 

माझी माणसं या मालिकेतून विनायक माळीचे छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली आहे. आपल्या विशिष्ट शैलीने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवणाऱ्या विनायक माळीला मालिकेत पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे. या मालिकेत त्याची दमदार एन्ट्री झाली असून यातही तो विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकूल घेईल असा विश्वास प्रेक्षकांना आहे. 

विनायक माळी हा सोशल मीडिया स्टार आहे हे सर्वांना माहीत आहे. आगरी कुटुंबात जन्म झालेल्या विनायकने वकिलीचे शिक्षण घेतले. विप्रो कंपनीतील नोकरी सोडून तो सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ बनवू लागला. सुरुवातीला त्याने हिंदी भाषेतून व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली मात्र या व्हिडिओला खूप कमी प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर त्याने आगरी भाषेतूनच व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. आगरी भाषेतील त्याचे भन्नाट व्हिडीओ अल्पावधीतच लोकांना आवडू लागले. युट्युबवरील त्याचे अनेक मजेशीर व्हिडिओ प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.