Join us  

उदित नारायण यांनी पहिल्यांदाच सांगितला‘रुक जा ओ दिल दीवाने’ गाण्यामागील किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 7:00 PM

उदित नारायण विशेष भागात सर्व स्पर्धक उदित नारायणची गाजलेली गाणी आपल्या शैलीत गाऊन सर्वांवर आपली छाप टाकणार आहेत.उदितजींच्या 90 च्या दशकातील गाण्यांनी सर्वांच्या त्या काळातील स्मृती जाग्या झाल्या.

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या या भागात  उदित नारायण याला प्रत्यक्ष भेटण्याची संधी अनपेक्षितपणे मिळाली, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा आगामी भाग तुम्हाला जुन्या स्मृतींमध्ये रममाण करणार असून तो प्रेक्षकांना 90 च्या दशकात घेऊन जाईल. या उदित नारायण विशेष भागात सर्व स्पर्धक उदित नारायणची गाजलेली गाणी आपल्या शैलीत गाऊन सर्वांवर आपली छाप टाकणार आहेत.

या भागात  स्पर्धक मोहम्मद फैझने ‘रुक जा ओ दिल दीवाने’  हे गाणे गायल्यानंतर उदित नारायण जुन्या आठवणी शेअर करत  एक किस्सा सर्वांना ऐकविला. उदित नारायण यांनी हे  संपूर्ण गाणे न टेकमध्ये रेकॉर्ड केले होते. ही गोष्ट फारशी कोणाला माहीती नाही.या गाण्याची आठवण सांगताना उदित नारायण यांनी सांगितले की, “मला चांगलं आठवतंय, मला या गाण्याच्या रेकॉर्डींग साठी स्टुडिओत दुपारी 2.00 वाजेपर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. पण मी तिथे संध्याकाळी 6.00 वाजता पोहोचलो.  मला पोहचायला  खूप लेट झाला होता गाण्याचे सर्वच कलाकार, दिग्दर्शक यश चोप्राजी आणि संगीतकार जतिन-ललित हे माझ्यावर वैतागले होते. त्यांची नाराजी दूर करण्याचा एकच मार्ग माझ्याकडे होता आणि तो म्हणजे मला हे गाणं अगदी अचूक म्हणून दाखवावं लागणार होतं. मी माइकजवळ उभा राहिलो आणि मला काही ते गाणं नीट म्हणता येईना. त्यामुळे सर्वजण आणखी वैतागले. चित्रपटात हे गाणं कोणत्या परिस्थितीत सादर होणार आहे, ते संगीतकार जतिन-ललित यांनी मला समजावून सांगितलं. 

शाहरूख खान आणि यश चोप्राजींसाठी गाणं गाण्याची संधी मला हातची जाऊ द्यायची नव्हती. पण मनावरील दडपणामुळे मला ते गाणं नीट गाता येत नव्हतं. परिणामी एक वेळ अशी आली की ते मला तिथून निघून जाण्यास आणि दुसर्‍्या गायकाकडून हे गाणं गाऊन घेण्यास तयार झाले होते. मी एकाच वेळी मनातून धास्तावलेला, निराश आणि दडपलेला होतो. तेव्हा मी स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतलं आणि परमेश्वराची प्रार्थना केली. त्यानंतर मी खोलीतून बाहेर आलो आणि यशजींसमोर जाऊन उभा राहिलो. मी त्यांना म्हटलं, की त्यांनी मला आता अखेरची संधी द्यावी. त्यंनीही मोठ्या मनाने मला ही संधी दिली आणि नंतर हे गाणं मी रेकॉर्ड  केलं. मी या गाण्याचे तिन्ही अंतरे म्हटले आणि एकाच टेकमध्ये हे गाणं ओके झालं. देवाच्या कृपेने हे गाणं चांगलंच हिट झालं.”

उदितजींच्या 90 च्या दशकातील गाण्यांनी सर्वांच्या त्या काळातील स्मृती जाग्या झाल्या. परीक्षक अमाल मलिकने या नामवंत गायकाबद्दल आपला आदरभाव व्यक्त केला आणि त्यच्याबरोबर आपल्यला परीक्षण करायला मिळत आहे, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रीतमने गायलेल्या ‘जादू तेरी नजर’  या गाण्याने  या भागात चार चाँद लावले . सुगंधा दातेने गायलेल्या ‘चाँद छुपा बादल में’  गाण्याने मंचावर एक प्रकारचे रोमँटिक वातावरण तयार झाले. यावेळी परीक्षक शान आणि उदितजींनी एकत्र गायलेल्या ‘डू यू वॉन्ना पार्टनर’  या गाण्याने एकच धमाल केली.  

टॅग्स :उदित नारायण