Join us  

कलाकारांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत शेअर केल्या खास आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 6:20 PM

छोट्या पडद्यावरील कलाकारांनी आपल्या लाडक्या प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हर्षदा खानविलकर -

यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. कारण यंदा दिवाळीत माझी स्टार प्रवाहवर ‘रंग माझा वेगळा’ ही नवी मालिका सुरु होतेय. त्यामुळे डबल सेलिब्रेशन आहे. खरं सांगायचं तर दिवाळीच्या खूप कडू गोड आठवणी आहेत. दिवाळीतच माझं वडिलांचं छत्र हरपलं. त्यांना जाऊन १८ वर्ष होतील. पण वडिलांची कमतरता माझा भाचा कुशलने भरुन काढली. गेली १७ वर्ष तो माझ्या आयुष्यात नवनवे रंग भरतो आहे. दिवाळीच्या फराळात माझी फारशी मदत नसली तरी माझी आई उत्तम फराळ बनवते. आणि मी उत्तम खवय्यी असल्यामुळे त्यावर मनसोक्त ताव मारते. दिवाळीत कुटुंबासमवेत घालवलेला वेळ वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा देऊन जातो असं मला वाटतं

 

विशाल निकम 

‘साता जल्माच्या गाठी’ मालिकेतील युवराज म्हणजेच विशाल निकम मुळचा सांगलीचा. घरचा मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे घरात दिवाळी सणाचं खूप महत्त्व आहे. माझ्या घरी दिवाळीच्या पहिल्या दिवशी शेणापासून बळीराजाची मूर्ती तयार करुन त्याची पुजा केली जाते. सहकुटुंब ही पूजा करुन मग फराळावर यथेच्छ ताव मारला जातो. लहानपणी आम्ही सर्व मुलं एकत्र येऊन किल्ला बनवत असू. महिनाभर आधापासून आम्ही मुलं तयारी करायचो. मातीपासून बनवलेला किल्ला, शिवाजी महाराज आणि मावळे यांचा थाट काही औरच असायचा. माझ्यामते दिवाळी सणाचा आनंद इतरांसोबत वाटण्यात खरी मजा आहे. यंदा गरजुंना खाऊ आणि कपडे वाटप करुन दिवाळी सण साजरा करणार आहे.

 एकता लब्दे 

‘विठुमाऊली’ मालिकेतील रखुमाई म्हणजेच एकता लब्देचा आवडता सण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सहकुटुंब सिद्धीविनायकाचं दर्शन घेणं हे मी नित्यनेमाने करते. दिवाळीची चाहूल लागली की घरातल्या साफसफाईपासून ते अगदी फराळापर्यंत प्रत्येक गोष्टीत माझा सहभाग असायचा. शूटिंगमुळे आता ते शक्य होत नाही. पण यंदाच्या दिवाळीत वर्षभरात न भेटलेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना मी आवर्जून भेटणार आहे.

 

अजिंक्य राऊत

विठुमाऊली म्हणजेच अजिंक्य राऊतसाठी दिवाळी हा फक्त सण नाही तर समृद्ध करणारा अनुभव आहे. उटणं, अभ्यंगस्नान, फराळ, दिव्यांची रोषणाई आणि आप्तेंष्टांची भेट या साऱ्या गोष्टी माझ्यासाठी खुपच स्पेशल आहेत. दिवाळी म्हण्टलं की मला आठवतात ते आजीच्या हातचे पाटोदा लाडू. लाडूचं नाव जितकं इण्टरेस्टिंग आहे तितकीच त्याची चवही. माझं आजोळ बीडचं. बीडमध्ये पाटोदा नावाचं एक छोटंस गाव आहे. त्याच गावाच्या नावावरुन लाडुंना पाटोदा लाडू हे नाव पडलं. आजीने बनवलेल्या लाडुंची चव अजूनही माझ्या जीभेवर रेंगाळते आहे. यंदा आजीला महिनाभर आधीच लाडू बनवण्याची खास फर्माईश केलीय. त्यामुळे भरपूर लाडू फस्त करणे हा माझा यंदाच्या दिवाळीचा अजेंडा आहे.

 

सुप्रिया पाठारे 

आम्ही पुर्वी वर्तकनगर चाळीत रहायचो. चाळीतल्या दिवाळीची मजा काही औरच. चाळीतलं कुटुंब एकत्र येऊन आम्ही फराळाचा आनंद लुटायचो. खमंग फराळ आणि त्यासोबतच खुमासदार गप्पा रंगायच्या. फ्लॅटमधल्या बंद खोल्यात हा आनंद हरवत चालला आहे. पण स्टार प्रवाहवर सुरु असलेल्या ‘मोलकरीण बाई’ मालिकेमुळे ही कसर भरुन निघतेय. दिवाळी स्पेशल भाग आम्ही मालिकेत शूट केलाय. घरी मी यंदा फराळ बनवलाय. शूटिंगच्या वेळा सांभाळून शंकरपाळे, करंजी आणि मक्याचा चिवडा बनवला आहे. आमचा इको फ्रेण्डली दिवाळी साजरी करण्यामागे कल असतो. मला फटाक्यांचं फार आकर्षण नाही आणि मुलांनीही कधी हट्ट केला नाही. त्यामुळे भरपूर खरेदी आणि फराळ असा आमचा दरवर्षीचा बेत असतो.

 

मंदार जाधव 

दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे. दिवाळीचा सगळा फराळ घरीच बनतो. रात्रभर जागून आम्ही सहकुटुंब तो बनवतो. एकत्र फराळ बनवण्यात आणि तो फस्त करण्यात वेगळीच मजा आहे. मला रांगोळी काढायलाही खूप आवडतं. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत आवर्जून रांगोळी काढतो. सणाच्या निमित्ताने नातलगांशी होणाऱ्या भेटीगाठी, भेटवस्तूंची देवाण-घेवाण जगण्याला नवी उभारी देतात असं मला वाटतं. यंदा दिवाळीच्या शुभदिनी ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेत श्री दत्त आणि अनघा देवी यांच्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. मालिकेतलं हे नवं वळण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

 

 

टॅग्स :स्टार प्रवाह