भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा आजचा हा दिवस... भावाच्या मनगटावर राखी बांधून बहिण त्याच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते... देशभर आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो... टीव्ही इंडस्ट्रितले सेलिब्रेटी रक्षाबंधन कसा साजरा करतात आणि जाणून घ्या रक्षाबंधनच्या काही सुंदर आठवणी...
अय्याज अहमद ऊर्फ अग्निफेरामधला बैजू
प्रियंवदा कांत माझी पहिली मैत्रीण आणि माझी दुसरी आई. तिच्याबरोबरचं माझं नात फारच जवळकीचं आहे. आम्ही एकमेकांना आठ वर्षांपासून ओळखतोय, आम्ही सख्खे बहीण-भाऊ नसलो तरीही आम्ही मनाने सख्खी भावंडं मात्र आहोत. गेल्यावर्षीच्या रक्षाबंधनाच्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत, मी खूपच आनंदीत होतो तेव्हा. तिला कुठूनतरी कळलं की मी बॅटमॅनचा प्रचंड चाहता आहे, त्यात मी वागतोही लहान मुलांसारखाच. त्यासाठी तिने माझ्यासाठी बॅटमॅनची राखी मिळवच्ली आणि त्यावर चक्क माझं नाव उर्दूमध्ये लिहिलेलं होतं. आतापर्यंतच्या गिफ्टपैकी हे माझ्यासाठी सर्वोत्तम, शब्दांत व्यक्त न करता येणारं अमूल्य गिफ्ट आहे. मला खात्री वाटते की मी या जगातल्या अनेक वाईट गोष्टींपासून तिचं रक्षण करू शकेन. मला हेही माहित्येय की तीसुद्धा माझे वाईट गोष्टींपासून रक्षण करत असते आणि माझी काळजी घेत असते.
हिमांशु मल्होत्रा ऊर्फ परम अवतार श्री कृष्ण मधील भगवान विष्णु
आपण कुणाशीतरी मोकळं व्हावं आणि एकाच छताखाली त्यांनी तुमच्यापाशी सगळं व्यक्त करावं, अशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्कीच असावी. माझ्या बहिणींबरोबर माझं हेच नातं आहे. रक्षाबंधन माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचं राहिलं आहे आणि यापुढेही राहील, कारण माझ्या दोन्ही बहिणी आहेतच गोड. रक्षाबंधन म्हणजे छान छान जेवण आणि मिठाया अशाच आठवणी आहेत माझ्या मनात. याहीवर्षीसुद्धा काही हे सगळं होणार आहे, कारण माझ्या बहिणी घरी येत आहेत. आम्ही एकत्र रक्षाबंधनाचा सण साजरा करणार आहोत आणि आमच्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रमणार आहोत.
सायली संजीव ऊर्फ परफेक्ट पतीमधील विधिता
'रक्षाबंधन' माझ्यासाठी खूप महत्त्वाचा सण आहे. मी सगळ्यात लहान असल्याने, माझ्या भावाने माझे खूप लाड केलेत. तो माझा मित्र तर आहेच शिवाय माझ्या आयुष्यात माझं संरक्षण करणारी व्यक्तीही आहे. मला रक्षाबंधनाचे जुने आणि रम्य दिवस फार आठवतात, मी माझ्या मोठ्या भावाकडे, शंतनुकडे बऱ्याच काय काय गोष्टी मागायचे. त्यातली मजाच वेगळी होती, मी खूप मिस करतेय या गोष्टी. आता आम्ही मोठे झालोय आणि धमाल काहीशी कमी झालीये. रक्षाबंधनाचा एखादा प्रसंग मला नाही आठवत, पण माझ्या लहानपणी हा सण माझ्यासाठी खूप खास होता, त्या आठवणी फारच रम्य होत्या.’’