रंगभूमी, सिनेमा आणि मालिका अशा विविध क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. दमदार अभिनयानं मुक्तानं रसिकांवर मोहिनी घातली आहे. रसिकांची हीच लाडकी अभिनेत्री आता छोट्या पडद्यावर परतली आहे. रुद्रम या मालिकेच्या माध्यमातून मुक्ता रसिकांच्या भेटीला आली आहे. एक अनपेक्षित अनुभव देणाऱ्या ‘ती' च्या प्रतिशोधाचा थरार छोट्या पडद्यावर रसिकांना पाहायला मिळणार आहे. याचनिमित्ताने मुक्ता बर्वेशी केलेली ही खास बातचीत.
पाच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. ही मालिका स्वीकारण्याचं काही खास कारण होते ते जाणून घ्यायला आवडेल ?
ब-याच वर्षांपासून शो करायचं मनात होतं. सिनेमांच्या कमिटमेन्ट्समुळे सगळ्या गोष्टींना वेळ देणं कठीण होतं. तसं पाहायला गेलं तर मला मुळात टीव्हीवर काम करायला खूप आवडतं. मात्र मला हवे तसे शो आणि हवी तशी भूमिका मिळाल्या नाहीत. माझ्या वाट्याला काही स्क्रीन शोज आले. मध्यंतरीच्या काळात मी सिनेमात बिझी झाले. मात्र आता ब-याच वर्षांनी म्हणजेच तब्बल पाच वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. 'रुद्रम' ही मालिका एक इमोशनल थ्रिलर स्वरुपाची आहे.लग्नासंदर्भातली आणि पॉझिटिव्ह मार्गाने पुढे जाणारी या मालिकेची कथा आहे. जेव्हा कुणावर अन्याय होतो तेव्हा कोणत्या थराला जाऊन ती आवाज उठवते. असं या मालिकेचं कथानक आहे. या मालिकेचे लेखन गिरीश जोशी यांचं असून विनोद लव्हेकरनं या मालिकेचं दिग्दर्शन केले आहे. मालिकेचा स्टार्ट टू एंड मला माहिती आहे. सिनेमाच्या शेड्युलप्रमाणे मालिकेचे शूटही झालंय. सगळे वेळेत जमून आले आहे. मालिकेची स्टारकास्टही तगडी आहे. वंदना गुप्ते, सतीश राजवाडे, डॉ. मोहन आगाशे, संदीप पाठक, किरण करमरकर आणि अन्य दिग्गज नावं या मालिकेशी जोडली गेली आहेत. उत्तमोत्तम आणि दर्जेदार कलाकारांची मांदियाळी हे या मालिकेचं आकर्षण आहे. विशेष म्हणजे सगळ्यात वेगाने घडणारी आणि तरीही केवळ ठराविक भागांमध्ये संपणारी ही गोष्ट आहे. त्यामुळेच रसिकांसाठी ही मालिका एक पर्वणी ठरणार आहे.
छोट्या पडद्याशी तुझं जुनं नातं आहे. मात्र इतक्या वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतल्यावर तुला काय स्थित्यंतरं जाणवली आहेत ?
आता खूप बदल झाले आहेत. आधी मी काम केलेल्या मालिकांचं इनडोअर शूटिंग व्हायचं. त्यात आता मोठा बदल झाला आहे. सध्या मी केलेल्या मालिकांचे आऊटडोअर शूट केले आहे. आऊटडोअर शूट करताना ब-याच गोष्टींवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. विशेषतःखूप अॅलर्ट राहावं लागतं कारण कमी वेळात परफेक्ट सीन तुम्हाला द्यावा लागतो. रिअल लोकेशन्सवर काम करण्याचीही मजा वेगळीच आहे,शिवाय ते काम एक वेगळा अनुभव देऊन जातं. ब-याचदा असं होतं की एखाद्या रिक्षात सीन शूट करायचा असतो तेव्हा त्या रिक्षात दिग्दर्शक नसतो. मग अशावेळी कलाकारालाच तो सीन कसा होतो आहे याचीही काळजी घ्यावी लागते. सध्या मालिकांमध्ये रिअल लोकेशन शूट करतानाचे शॉट्स आपण पाहतो. मालिकांमध्ये रिअॅलिस्टिक गोष्टी वाढल्या आहेत. ब-याच नवनवीन गोष्टी आणि बदल दिवसागणिक पाहायला मिळतात.यासोबतच छोट्या पडद्याबाबत झालेला खूप मोठा बदल म्हणजे प्रमोशन.वेगवेगळ्या माध्यमांमधून मालिकांचं प्रमोशन करण्यात येतं. प्रमोशनसाठी नवनवे फंडे वापरले जात आहेत. असंच एक वेगळं प्रमोशन मीसुद्धा केलं. मी माझा एक व्हिडीओ केला तो अपलोड करण्याआधी सगळ्यांना विश्वासात घेतलं. विशेषतः माझ्या आईला या सगळ्या व्हिडीओची कल्पना देत तो फेसबुकवर टाकणार आहे असं तिला सांगितलं. फेसबुकवर व्हिडीओ अपलोड करताच त्याला तुफान प्रतिसाद लाभला. मुक्ता खरंच कोणत्या संकटात आहे की काय असं रसिकांना वाटू लागलं. ब-याच कमेंट्सवर कमेंट येऊ लागल्या. हा प्रमोशनल व्हिडीओ नसून खराखुराच व्हिडीओ असल्याचं अनेकांना वाटलं. सगळ्या कमेंट्स आणि व्हिडीओला मिळणारा प्रतिसाद पाहून वाटलं की आयडिया वर्कआऊट होत आहे. मग यानंतर लगेचच शोची घोषणा करण्यात आली.
मालिका पाहायला तुला वेळ मिळतो का? लेखनाच्या दर्जाबद्दल तुला काय वाटतं ?
बिझी शेड्युल असल्याने फार काही पाहता येत नाही. त्यातल्या त्यात रिअॅलिटी शोज किंवा न्यूज बघते. वेळ मिळालाच तर फार फार एखाद्या मालिकेचा एपिसोड बघते. शूटिंगच्या बिझी शेड्युल असल्याने फार काही करणं शक्य होत नाही. सध्या मालिकांमध्ये कोणता ट्रेंड सुरु आहे हे माहित नाही. माझ्या मते ते इतकं महत्त्वाचं नाही. कारण एखादं इतकं तगडं आणि सशक्त असं लिखाण समोर येतं की ज्यामुळे संबंधित नाटक असो वा मालिका त्याची ख-या अर्थाने दिवाळीच असते.
तुझ्या आरजे या नव्या इनिंगविषयी जाणून घ्यायला आवडेल ?
नाटक, सिनेमा, मालिका अशा तिन्ही माध्यमांनंतर आता एका चौथ्या माध्यमाशीही मी जोडली गेली आहे. सध्या आरजे म्हणून काम करण्याचा आनंद घेत आहे. मी सादर करत असलेल्या कार्यक्रमांचं आठ शहरांमध्ये प्रसारण होतं.आरजे म्हणून काम करणं एक वेगळं चॅलेंज आहे असं मला वाटतं. ते खूप रिअॅलिस्टिक असतं. त्यामुळे घराघरात पोहचते, शिवाय रेडिओमुळे आवाज एक नवी ओळख बनते. माझ्या मते प्रत्येक माध्यमाचं वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे विविध माध्यमांत वावरताना, काम करताना खूप मजा येते.
वेबसिरीज हा प्रकार खूप प्रचलित आणि लोकप्रिय होत चालला आहे.वेबसिरीज करण्याचा तुझा काही विचार आहे का ?
खरं सांगायचं तर माझं नाटक 'कोडमंत्र' ही खूप चांगलं सुरू आहे. त्याला रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एक निर्माती म्हणून जबाबदारी पार पडत असताना सगळ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. जास्तीत जास्त नाटकाचे प्रयोग कसे होतील यावर माझा भर असतो. मुळात त्या नाटकावर बॅकस्टेज आर्टिस्टची घरं चालतात. या सगळ्या गोष्टींवर लक्ष देताना वेळेमुळं माझ्यावर खूप मर्यादा आहेत.शिवाय नाटक करता करता सिनेमाही करते.लवकरच दोन ते तीन सिनेमांचं शूटिंग सुरु करणार आहे. त्यामुळे रंगभूमी, सिनेमा आणि मालिका हे सध्या एन्जॉय करत असल्याने वेबसिरीजचा सध्या विचार नाही. काही करायचं असेन तर ते करेन ज्यात काही मर्यादा नसतील.