कोरोनामुळे सर्वच उदयोगधंदे बंद आहेत. याचा फटका मनोरंजन क्षेत्रालाही प्रचंड बसला आहे. अनेक कलाकारांवर आर्थिक परिस्थितीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कलाकार कोरोनाची पहिली लाट आल्यापासून कोणतेच काम न मिळाल्यामुळे घरीच बसून आहेत. हाताला कुठलेच काम नाही यामुळे बहुतेक कलाकार परिस्थितीपुढे हतबल झाले आहेत. हातात असलेला पैसाही खर्च झाल्याने आता काय खावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. अशात आता ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांना देखील आर्थिक अडचणीत सापडल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आमच्यासारख्या कलाकारांसाठी ही वेळ संघर्षाची ठरत आहे. कोरोना काळात सगळेच आर्थिक अडचणीत आहेत. पण एरव्हीदेखील असे अनेक उदाहरणं आहेत ज्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. कलाकारांच्या उतारवयात किंवा पडत्या काळात कुणीच त्यांच्याकडे लक्षही देत नाही. अशी कित्येक उदाहरणं चित्रपटसृष्टीत आहेत ज्यांच्याकडे आपल्याच माणसांनी आणि सरकारनंही दुर्लक्ष केलं. या वयात आम्हाला आर्थिक मदत मिळत नाही.
स्वतः कमवू तेव्हा दोन पैसे मिळतील अशी परिस्थिती असणा-या ज्येष्ठ कलाकारांनी करावे तरी काय अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. या क्षेत्राला फिल्म इंडस्ट्री म्हणून ओळखले जाते. ही खरंच इंडस्ट्री आहे का? काम नसल्यामुळे आम्ही दोन पैसे कमवू शकत नाही, बरं परिस्थिती चांगली असली तरी काम मिळत नाही. ही काय आमची चुकी आहे का? कलाकारांवर अशी वेळ येऊच नये यासाठी चित्रपटसृष्टीने पुढाकार घेऊन काही ना काही ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे.
चित्रपटसृष्टीत इतकं योगदान देऊनही ज्येष्ठ कलाकारांसाठी कोणत्या खास उपायोजना या इंडस्ट्रीकडे नाहीत. कलाकारांसाठी प्रॉविडेंट फंड नाहीं, केयर फंड सारख्या कोणत्याच उपायोजना नाहीत. कोणत्याही प्रकारचे पेंशन प्लॅन आमच्यासाठी नाहीत. ज्या अशा कठिण काळात कलाकारांसाठी उपयुक्त ठरतील.अशावेळी आम्ही काय करायचे. कोरोना संकट आज आहे. उद्या सर्वकाही ठिक होईल, परत सर्वच जोमाने कामावर परततील अशी आशा आहे. त्यामुळे जीवनात कितीही कठीण क्षण आले तरी खचून न जाता सकारात्मक विचार करत राहणे असे हिमानी शिवपुरी यांनी सांगितले.