Join us  

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील हा कलाकार झळकणार रणबीर कपूरच्या 'शमशेरा'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 6:43 PM

Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील या कलाकाराची झलक रणबीर कपूरच्या 'शमशेरा' (Shamshera Movie) चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) या मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील जयदीप-गौरीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावते आहे. एवढंच नाही तर या दोघांशिवाय या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत अभिनेते सुनील गोडसे (Sunil Godse) यांनी साकारलेली दादासाहेबांची भूमिका फणसाप्रमाणे बाहेरून कडक आणि आतून प्रेमळ अशी आहे. त्यांच्या भूमिकेची प्रेक्षकांकडून प्रशंसा होत असते. दरम्यान सुनील गोडसे रणबीर कपूरच्या 'शमशेरा' (Shamshera) चित्रपटात झळकणार आहेत. 

सुनील गोडसे यांनी वादळवाट, राजा शिवछत्रपती यासारख्या बऱ्याच मालिकेत काम केले आहे. पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतही त्यांनी काम केले आहे. सिंबा, हायजॅक, काबूल एक्स्प्रेस या चित्रपटात काम केले आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत दादासाहेबांच्या भूमिकेतून घरात पोहचलेले अभिनेते सुनील गोडसे शमशेरा चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

आज शमशेरा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये सुनील गोडसे यांची झलक पाहायला मिळाली. त्यांच्या भूमिकेबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. शमशेराच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

या चित्रपटात शमशेराची कथा पाहायला मिळणार आहे. शमशेरा वडिलांसारखा खूंखार असा दरोडेखोर बनतो आणि आपल्या टोळीसोबत इंग्रजांशी दोन हात करायला मैदानात उतरतो. इंग्रजांना नाकात दम आणणाऱ्या शमशेराला वठणीवर आणायला इंग्रजांकडून शुद्ध सिंगला पाठवण्यात येते. आता या लढाईत कोण जिंकतो, हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला चित्रपट पाहावा लागणार आहे. येत्या २२ जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

टॅग्स :शमशेरारणबीर कपूरस्टार प्रवाह