Join us

"ती आईची भूमिका...", दिशा वकानीचं 'तारक मेहता'मध्ये कमबॅक न करण्यामागचं कारण आलं समोर, भावाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 11:28 IST

Taarak Mehta Ka Ulta Chashma : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ने १७ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या मालिकेतील 'सुंदर'ची भूमिका सोडण्यापासून ते बहिण दिशा वकानीच्या 'दयाबेन'च्या भूमिकेतील पुनरागमनाबद्दलही त्याने खुलासा केला.

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Mehta Ka Ulta Chashma Serial)ने १७ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या मालिकेमुळे घरातील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्यापैकीच एक म्हणजे मयूर वकानी(Mayur Vakani), ज्याला 'सुंदर' या पात्रासाठी ओळखलं जातं. एका मुलाखतीदरम्यान, मयूरने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. 'सुंदर'ची भूमिका सोडण्यापासून ते बहिण दिशा वकानी(Disha Vakani)च्या 'दयाबेन'च्या भूमिकेतील पुनरागमनाबद्दलही त्याने खुलासा केला.

गेली १७ वर्षे ही मालिका प्रेक्षकांना फक्त हसवतेच आहे. पण या १७ वर्षांत ही मालिका प्रेक्षकांच्या भावनांशी जोडली गेली आहे, असं मयूर वकानी म्हणाला. तो म्हणाला, 'मी ४-५ वर्षांपूर्वीचा एक किस्सा सांगू इच्छितो. मी माझ्या एका नातेवाईकासोबत एका कार्यक्रमात गेलो होतो. तिथे आम्ही नातेवाईकाच्या मित्राच्या आईला भेटलो. तेव्हा त्यांनी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. 'मला कॅन्सर झाला होता. एक वेळ अशी होती की मला वाटले आता मी वाचणार नाही. पण, माझ्यासाठी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका आशेचा एकच किरण होती. उद्या संध्याकाळी ८.३० वाजता 'तारक मेहता' पाहायचा आहे, हा विचारच मला जिवंत ठेवत होता. मालिका पाहिल्यामुळे माझ्यामध्ये लढण्याची जिद्द निर्माण झाली.'

मयूरने सांगितला भावलेला प्रसंगमयूर वकानी म्हणाला, ''त्या म्हणाल्या, 'ही मालिका माझे आयुष्यच बनली होती आणि याच आशेमुळे मी कॅन्सरला हरवू शकले. डॉक्टरही चकित झाले होते आणि मला विचारत होते की मी इतकी लवकर कशी बरी झाली. पण तुमच्या मालिकेने मला ताकद दिली. ही फक्त एक मालिका नाही, ती माझ्यासाठी औषधासारखी आहे. आज तुम्हाला भेटून मला असं वाटत आहे की मला दुसरं आयुष्य मिळालं आहे आणि त्यासाठी मी खरोखर खूप आभारी आहे.' जेव्हा त्यांनी हे सांगितलं, तेव्हा मी खूप भावुक झालो. माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग घडले आहेत, पण हा प्रसंग माझ्यासोबत नेहमीच राहील.''

'सुंदर'ची भूमिका पहिल्यांदा कशी मिळाली?पहिल्यांदा भूमिका मिळाल्यावर मयूर म्हणाला, ''जेव्हा मला ही भूमिका पहिल्यांदा मिळाली, तेव्हा मी खूप काही वाचलं होतं आणि अनेकदा विचार करत होतो की मी ही भूमिका योग्यरित्या साकारू शकेन की नाही. मला स्वतःवर शंका होती, कारण मी तारक मेहतांनी लिहिलेले वाचत मोठा झालो होतो. त्यांनी लहान-लहान गोष्टीसुद्धा इतक्या अप्रतिम पद्धतीने सादर केल्या होत्या. उदाहरणार्थ, जेठालालच्या रागाबद्दल. आता विचार करा. एखादा अभिनेता अशी लिहिलेली गोष्ट कशी साकारू शकतो? त्यांचं लिखाण इतकं अनोखं, इतकं धारदार होतं आणि गुजरात ४० वर्षांपासून त्यांच्याशी जोडलेलं होतं.''

दयाबेनच्या पुनरागमनाबद्दल मयूर म्हणाला...दयाबेनच्या पुनरागमनाबद्दल मयूर म्हणाला, ''मी तिचा प्रवास खूप जवळून पाहिलं आहे, कारण मी तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणा आणि विश्वासाने काम करता, तेव्हा देवाचा आशीर्वाद नक्कीच मिळतो. ती खरोखर खूप भाग्यवान आहे, पण त्याचबरोबर तिने खूप मेहनतही घेतली आहे. म्हणूनच लोकांनी तिला दयाबेनच्या भूमिकेत इतकं प्रेम दिलं. माझ्या वडिलांनी मला नेहमी योग्य मार्ग दाखवला आहे की आयुष्यातही आपण कलाकारच असतो. आपल्याला जी कोणतीही भूमिका मिळेल, ती पूर्ण प्रामाणिकपणे निभवायला हवी. आम्ही आजही त्यांच्या शिकवणीवर चालतो. सध्या, ती खऱ्या आयुष्यात एका आईची भूमिका पार पाडत आहे आणि ती भूमिका ती पूर्ण निष्ठेने निभावत आहे. मला पूर्ण खात्री आहे की माझ्या बहिणीच्या मनातही हेच विचार नेहमी असतील.''

टॅग्स :दिशा वाकानीतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा