छोट्या पडद्यावरील रसिकांचा लाडका ‘श्री’ ‘होणार सून मी..’ या मालिकेनंतर अभिनेता शशांक केतकर रंगभूमी गाजवतोय. ‘गोष्ट तशी गंमतीची’ या नाटकातून नाट्य रसिकांना शशांकच्या अभिनयाची झलक पाहायला मिळतेय. मात्र छोट्या पडद्यावरील रसिक लाडक्या ‘श्री’ म्हणजेच शशांकला मिस करतायत. मात्र त्यांची प्रतीक्षा आता संपलीय. कारण त्यांचा आवडता ‘श्री’ छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. झी युवा या नव्या वाहिनीवरील ‘इथेच टाका तंबू या मालिकेतून शशांक छोट्या पडद्यावर परततोय. यानिमित्ताने शशांकशी साधलेला हा संवाद.
‘इथेच टाका तंबू’ या नव्या मालिकेतून तू रसिकांच्या भेटीला येतोय. नाटक गाजत असताना या मालिकेत काम करण्याचा निर्णय कसा घेतला ? टीव्ही मालिका करायचं हे पहिल्यापासूनच ठरवलं होतं. टीव्ही या माध्यमानं मला एक नवी ओळख मिळवून दिली. त्या टीव्ही माध्यमाला मी नाकारु शकत नाही. माझं पहिलं प्रेम नाटक आहे. नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. नाटक करणं सोडायचं नाही. मात्र मालिकाही करायच्या आहेत. त्यामुळं ‘होणार सून मी...’नंतर मी मला मालिकांच्या ब-याच ऑफर्स येत होत्या. मात्र हव्या तशा भूमिका मिळत नव्हत्या. जी भूमिका सा-यांना आपलीशी वाटेल अशा भूमिकेच्या शोधात मी होतो. त्याचवेळी एके दिवशी मंदार देवस्थळी यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की एक नवं चॅनल येतंय, त्यासाठी नवी मालिका करतोय. या मालिकेतील एक भूमिका तुझ्या अवतीभोवती फिरणारी असेल. अगदीच टिपिकल फॅमिली ड्रामा नसून ही मालिका वेगळ्या धाटणीची असेल असं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी ही भूमिका करण्याचा निर्णय घेतला आणि नशीबाने एक चांगला प्रोजेक्ट मिळालाय. ‘इथेच टाका तंबू’ शीर्षकावरुन ही विनोदी असल्याचे वाटतंय. तर यातील तुझ्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल ? अडीच तीन वर्ष एकाच धाटणीची भूमिका करणं अशी इमेज मला तोडायची होती. त्यामुळंच थोडीशी प्रेमळ आणि रसिकांना आपलीशी वाटेल अशी भूमिका शोधत होतो. या मालिकेत मी कपिल साठे ही व्यक्तीरेखा साकारतोय. ही विनोदी भूमिका आहे. भूमिका करताना धम्माल येतेय. मला हवी तशी भूमिका साकारण्याची संधी मिळतेय. होणार सून मी.. या मालिकेत माझे शर्ट्स प्रसिद्ध झाले होते, तसंच या मालिकेबाबतही घडेल. मला सगळे विचारतात की या मालिकेत किती पात्र आहेत, तर मी त्यांना सांगतो की या मालिकेत आम्ही सगळेच पात्र आहोत. मालिका, नाटक आणि तू सिनेमाही करतोय. तर त्याविषयी काय सांगशील ? मालिकांमधून रसिकांचं भरभरुन प्रेम मिळालं. नाटकालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. आता काही सिनेमांमध्येही काम करतोय. त्याचं शुटिंग परदेशात होणार आहे. त्यामुळं मालिका, नाटक यांच्यासह सिनेमात काम करणंही एन्जॉय करतोय. रसिकांनी तुला आजवर भरभरुन प्रेम दिलं. तर याबाबत एखादा आठवणीतला किस्सा ? रसिकांनी मालिका, नाटक याला उदंड प्रतिसाद देत भरभरुन प्रेम दिलंय. त्यांच्या प्रेमाचे भरपूर किस्से आहेत. एकदा हायवेवर माझी गाडी बंद पडली. एका कुटुंबाने ते पाहिलं. त्यांनी माझी गाडी स्वतः दुरुस्तीला गॅरेजमध्ये टाकली. थोड्याच वेळात माझी एका हॉटेलमध्ये राहण्याचीही सोय केली. नंतर गाडी दुरुस्त झाली आणि मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघालो. मात्र यामुळं रसिक आपल्यावर किती प्रेम करतात याची अनुभूती आली. रसिकांच्या या प्रेमामुळंच मी स्वतःला खूप खूप नशीबवान समजतो. नवी मालिका रसिकांच्या भेटीला येतेय, तर रसिकांना काय सांगशील ? नव्या मालिकेतील ही भूमिका विनोदी आहे. असं म्हणतात ना की रडवणं सोपं आणि हसवणं तितकंच कठीण असतं. त्यामुळं रसिकांना हसवण्यासाठी, त्याचं मनोरंजन करण्यासाठी आणि ही भूमिका सगळ्यांना पसंत पडावी यासाठी प्रयत्न करतोय. ‘होणार सून मी...’ मधला श्री, गोष्ट तशी गंमतीची नाटक याला रसिकांनी जसं भरभरुन प्रेम दिलं तसंच प्रेम रसिक इथेच टाका तंबू या मालिकेतील कपिलवरही तितकंच प्रेम करतील अशी आशा आहे.Suvarna.lokmat@gmail.comछोट्या पडद्यावर ‘श्री’ पुन्हा टाकणार तंबू !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 17:58 IST