Join us  

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम टप्पूची वडिलांसाठी इमोशनल पोस्ट, सोनू सूदचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 8:14 PM

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील टप्पू म्हणजेच भव्य गांधीच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील टप्पू म्हणजेच भव्य गांधीच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले. आता वडिलांच्या आठवणीत टप्पूने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने अभिनेता सोनू सूदसोबत वडिलांच्या उपचारासाठी मदत केलेल्या नर्स, डॉक्टरांचे देखील आभार मानले आहेत. 

भव्य गांधीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, 'माझ्या वडिलांना ९ एप्रिल रोजी कोरोना झाला. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना डॉंक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. कोरोनावर मात करण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले. माझ्या आयुष्यात जे काही चांगले झाले आहे, त्याचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या वडिलांना जाते.'

त्याने पुढे लिहिले की, 'मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो लसीकरण करून घ्या. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जीवघेण्या व्हायरसवर मात करण्यासाठी हाच एक पर्याय आहे.' 

भव्यने या कठीण काळात त्याला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानत म्हणाला की, 'मी सर्व डॉक्टर, नर्स आणि सर्व रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. ज्याठिकाणी माझे वडील दाखल होते. सोनू सूद सरांचे देखील आभार. मला माहित आहे पापा तुम्ही आहात त्याठिकाणी आनंदी आहात. मला सगळे काही शिकवण्यासाठी आभार. लव्ह यू पापा...'

वडिलांना कोरोना झाल्यावर त्यांच्या उपचारासाठी टप्पूला वणवण भटकावे लागले. खूप प्रयत्नानंतर त्यांना कोकिळाबेन रूग्णालयात बेड मिळाला. पण  ११ मे रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.भव्य सध्या टीव्हीपासून दूर गुजराती चित्रपटांमध्ये बिझी आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील प्रत्येक पात्रांवर रसिकांनी भरभरून पसंती दर्शवली. टप्पूची व्यक्तिरेखा साकारणारा भव्या गांधी हा प्रेक्षकांचा प्रचंड लाडका बनला होता. भव्याला याच मालिकेने खरी लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेतील त्याचा अभिनय, त्याची केस उडवण्याची स्टाइल सगळे काही रसिकांना खूपच आवडायचे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच तो या मालिकेचा भाग होता. ९ वर्षे तो ही भूमिका साकारत होता. २०१७ मध्ये त्याने हा शो सोडला. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माकोरोना वायरस बातम्या