Join us  

स्वप्नील आणि अमृताचा 'जिवलगा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 8:00 PM

अभिनेते स्वप्नील जोशी व सिद्धार्थ चांदेकर हे बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागम करत आहेत. तसेच हिंदी आणि मराठी पडदा गाजवणारी अमृता खानविलकर पहिल्यांदाच मालिकेमध्ये अभिनय करताना दिसणार आहे

ठळक मुद्देअमृता खानविलकर पहिल्यांदाच मालिकेमध्ये अभिनय करताना दिसणार आहेमालिकेचे शीर्षक गीत सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले

स्टार प्रवाह’ वरील बहुचर्चित आगामी मालिका ‘जिवलगा’ ही येत्या २२ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. आघाडीचे अभिनेते स्वप्नील जोशी व सिद्धार्थ चांदेकर हे बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागम करत आहेत. तसेच हिंदी आणि मराठी पडदा गाजवणारी अमृता खानविलकर पहिल्यांदाच दैनदिन मालिकेमध्ये अभिनय करताना दिसणार आहे. त्यांच्याबरोबर मधुरा देशपांडे ही गुणी अभिनेत्री या मालिकेत बघायला मिळणार आहे.   

“जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा.. ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा..” अशा आशयाची ही प्रेमकथा असून या मालिकेचे शीर्षक गीत नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. ‘जग सारे इथे थांबले वाटते… भोवताली तरी चांदणे दाटते… मर्मबंधातल्या या सरी बरसता… ऊन वाटेतले सावली भासते… ओघळे थेंब गाली सुखाचा मिटे अंतर लपेटून घेता… तू माझा मीच तुझी सख्या जिवलगा… ऐल ही तूच अन् पैलही तू सख्या जिवलगा…’ असे सुंदर शब्द या शीर्षक गीताचे असून वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, आर्या आंबेकर आणि हृषिकेश रानडे या आघाडीच्या गायकांनी या गाण्याला आवाज दिला आहे

  

गीतकार श्रीपाद जोशीं यांनी हे गाणे लिहिले असून निलेश मोहरीरने ते संगीतबद्ध केलंय. ‘जिवलगा’ मालिकेतील काळजाला भिडणाऱ्या या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. तर मालिकेची संकल्पना स्टार प्रवाहचे कॉन्टेन्ट अँड प्रोग्रामिंग विभागाचे प्रमुख सतीश राजवाडे यांची आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. ही मालिका उमेश नामजोशी हे दिग्दर्शित करत आहे.

 

टॅग्स :स्वप्निल जोशीअमृता खानविलकर