स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. इतकेच नाही तर या मालिकेतील पात्रांनादेखील चाहत्यांची पसंती मिळते आहे. या मालिकेत देवकीच्या भूमिकेतून अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) घराघरात पोहचली आहे. नुकतेच तिला कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे ती सध्या प्रसुती रजेवर आहे. या मालिकेत तिच्याजागी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी पाहायला मिळते आहे. दरम्यान मीनाक्षीच्या लेकीची झलक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान आज मीनाक्षीचा नवरा कैलाश वाघमारे याचा वाढदिवस असून या निमित्ताने तिने तिचा बाळासोबतचा फोटो शेअर करत हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मीनाक्षी राठोड हिने नवरा कैलाश वाघमारेचा लेकीसोबतचा फोटो शेअर केला आहे. मात्र यात बाळाचा चेहरा इमोजीनं लपवला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले की, बाळाला जन्म दिल्यानतंर आई चा दूसरा जन्म होतो असं म्हणतात. पण बाप झाल्यापासून तूझाही दूसरा जन्म झाल्यासारखा वाटतोय. म्हणूनच तर असं वेड्यासारखा वागतोय. मुलीसोबतचा हा नवीन वेडेपणा तुला मुबारक. नवीन जन्म दिवसाच्या खूप खूप सदिच्छा. यासोबतच मीनाक्षीने बाळाचा छान फोटो लवकरच टाकणार असल्याचे सांगितले.
मीनाक्षी राठोडने सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेशिवाय ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत पंचबाईंची भूमिका साकारली होती. मालिकाच नाहीतर ती चित्रपटातही झळकली आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ सिनेमातही तिने काम केले आहे.