Join us  

कृष्णा भारद्वाज आणि मानव गोहिल यांच्यात आध्यात्मिकतेचे बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 6:50 PM

रामाची भूमिका करणारे कृष्णा भारद्वाज आणि कृष्ण देवरायाची भूमिका साकारणारे मानव गोहिल यांच्यामध्ये पडद्यावर फार छान नाते आहे. पण, कॅमेऱ्यामागेही त्यांच्यात खास नाते आहे.

सोनी सबवरील 'तेनाली रामा' ही ड्रॉमेडी मालिका आपली रोचक कथा आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा यामुळे नेहमीच प्रेक्षकांना आकर्षून घेते. रामाची भूमिका करणारे कृष्णा भारद्वाज आणि कृष्ण देवरायाची भूमिका साकारणारे मानव गोहिल यांच्यामध्ये पडद्यावर फार छान नाते आहे. पण, कॅमेऱ्यामागेही त्यांच्यात खास नाते आहे.

या मालिकेतील व्यक्तिरेखांप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही या दोघांचा आध्यात्मिकतेवर विश्वास आहे. या दोघांमध्ये बऱ्याचदा या विषयाची प्रदीर्घ चर्चाही होते. बौद्ध धर्माला मानणारे मानव बऱ्याचदा कृष्णा यांच्यासमोर आपले विचार मांडतात. कृष्णा यांचाही आध्यात्मिकता आणि शांतीच्या तत्वज्ञानावर गाढ विश्वास आहे. याबद्दल कृष्णा भारद्वाज म्हणाले, 'चित्रीकरणादरम्यान आम्ही बऱ्याचदा एकत्र बसून मंत्रोच्चार करतो. शिवाय, एकमेकांना या विषयावर अधिक माहिती मिळावी यासाठी आम्ही पुस्तकांचीही देवाणघेवाण करतो. पण, हल्ली मानव फारसा सेटवर नसतो. मला त्याची आणि त्याच्यासोबत घालवलेल्या शांत क्षणांची आठवण येते. आम्हा दोघांसाठी ते क्षण खूपच निवांत असायचे.'आध्यात्मिकतेमुळे जुळलेल्या या बंधांबद्दल मानव गोहिल म्हणाले, 'कृष्णा आणि मी सेटवर फार मजा करतो. पण, आम्ही एकत्र घालवलेला आध्यात्मिक वेळ अधिक खास आहे. श्रद्धा आणि धर्म या विषयावर आमच्यात छान बंध जुळले. शिवाय, कृष्णाने इतर धर्मांबद्दल बरंच वाचलं असल्याने मला बरीच माहिती मिळाली. कलाकारांचे आयुष्य ग्लॅमरस दिसत असले तरी ते सोपे नाही. तुमच्या विचारांशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीसोबत अध्यात्म आणि श्रद्धांबद्दल बोलतानाचे वेचक क्षण व्यक्तीला स्थिर ठेवतात.'

टॅग्स :तेनाली रामासोनी सब