Join us  

गोव्यात शूटिंगला बंदी, 'अग्गंबाई सूनबाई', 'रंग माझा वेगळा'सह अनेक मालिका सापडल्या अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 6:15 PM

आता गोव्यात सुरू असलेल्या मराठी मालिकांचे शूटिंग आता अडचणीत सापडले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मालिका-चित्रपटांच्या शूटिंगला बंदी घातली आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यामुळे शूटिंगला बंदी असल्यामुळे अनेक मालिकांचे शूटिंग इतर राज्यात हलवण्यात आले होते. दरम्यान आता गोव्यात सुरू असलेल्या मराठी मालिकांचे शूटिंग आता अडचणीत सापडले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मालिका-चित्रपटांच्या शूटिंगला बंदी घातली आहे. सूर नवा ध्यास नवा, रंग माझा वेगळा, तू सौभाग्यवती हो, पाहिले ना मी तुला, अग्गंबाई सूनबाई, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकांचे सध्या गोव्यात शूटिंग सुरू होते. मात्र दहा मेपर्यंत या मालिकांचे शूटिंग स्थगित करण्यात आले आहे.

गोव्यात ३० हून अधिक ठिकाणी मालिका-चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. सूर नवा ध्यास नवा, रंग माझा वेगळा, तू सौभाग्यवती हो, पाहिले ना मी तुला, अग्गंबाई सूनबाई, सुख म्हणजे नक्की काय असतं यासारख्या मराठी मालिकांसोबत कुंडली भाग्य, गुम है किसी के प्यार में, आपकी नजरों ने समझा, ये है चाहतें, अपना टाइम भी आएगा या हिंदी मालिकांचं शूटिंग सुरु आहे. त्यामुळे आता मालिकेचे निर्माते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  

सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे सध्या चित्रीकरण गोव्यातील मडगांव येथे सुरू आहे. पण आता गोव्यात देखील रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे गोव्यात सुरू असलेल्या चित्रीकरणाला अनेक राजकीय पक्ष आणि नागरिकांचा विरोध आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी नुकताच सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या सेटवर येऊन चांगलाच गोंधळ घातला. मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये चित्रीकरण सुरू असताना विजय सरदेसाई यांनी विरोध केला. मडगाव आणि फातोर्डा या परिसरात रुग्ण वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.विजय यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून येथे कोरोनाचे नियम तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :गोवाअग्गंबाई सूनबाईप्रमोद सावंत