Join us  

शिवानी-अजिंक्यची लगीनघाई! हळदीचा व्हिडिओ समोर, 'बिग बॉस'च्या कलाकारांचा धिंगाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 1:39 PM

अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. 

सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. एकामागोमाग एक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रसाद जवादे-अमृता देशमुख, स्वानंदी टिकेकर, प्रथमेश-मुग्धा यांनी लग्नगाठ बांधली. आता मराठी कलाविश्वातील आणखी एका कपलची लगीनघाई सुरू आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. 

शिवानीने साखरपुड्याचे फोटो शेअर करत गोड बातमी चाहत्यांना दिली होती. त्यानंतर आता एक व्हिडिओ समोर आला आहे. अभिनेता माधव देवचकेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत 'बिग बॉस मराठी'मधील कलाकार नाचताना दिसत आहे. मेघा धाडे, नेहा शितोळे, सई रानडे यांच्याबरोबर शिवानीही व्हिडिओत धमाल करताना दिसत आहे. या व्हिडिओला त्याने 'शिवानी की शादी' असा हॅशटॅग दिला आहे.  हा व्हिडिओ शिवानी-अजिंक्यच्या हळदीच्या कार्यक्रमामधील असल्याचं सांगण्यात येत आहे. 

'देवयानी' मालिकेतून शिवानी घराघरात पोहोचली. 'बिग बॉस मराठी'मध्येही शिवानी सहभागी झाली होती. त्यानंतर अनेक मराठी सिनेमांमध्येही शिवानी झळकली. 'वाळवी', 'ट्रिपल सीट', 'घंटा' या चित्रपटांतही तिने काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' सिनेमात शिवानी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. 

शिवानीबरोबरच अजिंक्यदेखील अभिनेता आहे. सध्या तो झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. 'कुसूम' या मालिकेतही तो झळकला होता. तर 'पावनखिंड' सिनेमात अजिंक्य महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. 'तू जीवाला गुंतवावे' या मालिकेच्या सेटवर अजिंक्य आणि शिवानी पहिल्यांदा भेटले होते. तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ४ वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर आता ते लग्नबंधनात अडकणार आहेत. 

टॅग्स :शिवानी सुर्वेटिव्ही कलाकार