Join us  

शिवानी रांगोळे म्हणतेय, 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर'मधील रमाबाईंच्या भूमिकेनं दिली ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 7:15 AM

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका साकारते आहे.

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका साकारते आहे. शिवानीला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलंय.ऐतिहासिक भूमिका साकारण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी ती प्रचंड मेहनतही घेतेय. या मालिकेने नुकताच १०० एपिसोड्सचा टप्पाही गाठलाय. 

या भूमिकेबद्दल शिवानी म्हणाली की, आयुष्यातली ही खूप वेगळी भूमिका आहे. अतिशय समजूतदार आणि ठेहराव असणारं हे पात्र आहे. या भूमिकेसाठीचा पेहराव, भाषा या गोष्टीसुद्धा माझ्यासाठी नवं आव्हान आहे. धनंजय कीर आणि बाबुराव बागुल या लेखकांच्या पुस्तकांचं वाचन मी करतेय. रमाबाईंची भूमिका साकारण्यासाठी मला याचा फार उपयोग होतोय. यासोबतच दशमी प्रोडक्शन, स्टार प्रवाह वाहिनी आणि माझे सर्वच सहकलाकार यांच्या पाठिंब्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी मला मदत होतेय. या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा प्रचंड दडपण होतं. मी याआधी अशा प्रकारची भूमिका केली नव्हती. पण संपूर्ण टीमने प्रोत्साहन दिलं आणि मला नवं बळ मिळालं. पहिला एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर हळूहळू दडपण कमी होत गेलं. बघता बघता या मालिकेने १०० भागांचा टप्पा पूर्ण केलाय. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य झालं आहे. रमाबाईंसारख्या इतक्या मोठ्या व्यक्तिची भूमिका साकारणं हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव आहे.

 रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, आंदोलनं असो वा सत्याग्रह रमाबाई त्यांच्यापाठीशी सावली प्रमाणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी कुटुंबही सांभाळलं. महापुरुषाची सहचारिणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने पाळलं. अश्या या थोर व्यक्तीची भूमिका साकारायला मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं, असं शिवानी म्हणाली.

तिने पुढे सांगितलं, खरं सांगायचं तर एक अभिनेत्री म्हणून या भूमिकेने मला श्रीमंत केलं आहे. रमाबाईंचं कणखर व्यक्तिमत्त्व साकारताना त्यांचे विचार आणि जिद्द माझ्या मनात खोलवर रुजतेय.

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकर