Join us  

सयाजी शिंदे येणार ‘कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर, ‘झाडे लावा झाडे जगवा’चा देणार संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 6:30 AM

‘झाडे लावा झाडे जगवा’ या संदेशासोबत पर्यावरणाचे गांभिर्य आणि झाडांचे महत्त्व लक्षात घेऊन सयाजी शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलली आहे.

सयाजी शिंदे यांनी आपल्या अभिनयानं मराठी मनाला मोहिनी घातली. 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी', 'त्या रात्री पाऊस होता', 'ऑक्सिजन', 'वजीर' अशा अनेक सिनेमांमधून सयाजी शिंदे यांनी साकारलेला खलनायक रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला. अतिशय ताकदीचा अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांची ओळख आहे. आता छोट्या पडद्यावरही सयाजी शिंदे यांचे लवकरच दर्शन रसिकांना घडणार आहे.

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात दर गुरुवारी ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’ होतो ज्यामध्ये प्रेक्षकांची अशा व्यक्तीशी भेट होते ज्यांनी समाजाच्या हितासाठी निस्वार्थी मनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले असते. आणि येत्या गुरुवारी कर्मवीर म्हणून अभिनेते सयाजी शिंदे या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. ‘झाडे लावा झाडे जगवा’ या संदेशासोबत पर्यावरणाचे गांभिर्य आणि झाडांचे महत्त्व लक्षात घेऊन सयाजी शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलली आहे. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या मनात झाडांविषयी पहिला विचार कधी आला हे सांगितले आणि ‘झाड’ या विषयावरील अंगावर शहारे आणणारी आणि झाडाचे महत्त्व पटवून देणारी कविता देखील सादर केली.

 

तसेच काही दिवसांपूर्वीच झालेल्या पत्रकार परिषदेत सयाजी शिंदे यांनी त्यांच्या उपक्रमाची माहिती दिली. 'ट्री स्टोरी फौंडेशन'च्या माध्यमातून राज्यातील नगरसह औरंगाबाद, नाशिक, सातारा, धुळे, बीड यासह 19 ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धनाची चळवळ हाती घेतलेली आहे. एक एकर मध्ये 400 झाडांची रोपटी लावून देवराई प्रकल्प उभारणार आहे. यासाठी किमान एक एकर ते त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रात झाडे लावणार आहे. यामध्ये वेली, वेली, झुडपे, जंगली झाडे, तसेच वड, पिंपळ, लिंब यासारखी मोठी झाडे, फळझाडे लावून त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. तसेच सयाजी शिंदे पुढे म्हणाले, प्रत्येक कलाकाराने त्यांच्या गावात झाडे लावून त्यांचे संवर्धन केले तर त्यांना फार मोठी प्रतिष्ठा मिळू शकते. यापुढील काळात जो झाडे लावील तो प्रतिष्ठित अशी व्याख्या नव्याने तयार करण्यात येणार आहे. 

टॅग्स :नागराज मंजुळे