Join us  

सारेगमप लिटील चॅम्प्समुळे आयुष्यच बदलून गेलं - कार्तिकी गायकवाड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 8:00 AM

लिटील चॅम्पच्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड देखील परिक्षक म्हणून या कार्यक्रमात झळकतेयं.सारेगमपच्या मंचाने आमची ओळख निर्माण केली, या कार्यक्रमामुळे आमच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली.

सारेगमप लिटील चॅम्प्सचं नवं सीजन नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या सीजनमध्ये गायनाच्या क्षेत्रात इतिहास घडवणारे पंचरत्न परिक्षकाच्या खुर्चीवर बसून आता नव्या स्पर्धकांचं मार्गदर्शन करत आहेत. लिटील चॅम्पच्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड देखील परिक्षक म्हणून या कार्यक्रमात झळकतेयं. सारेगमपच्या मंचाने आमची ओळख निर्माण केली, या कार्यक्रमामुळे आमच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. या कार्यक्रमातील आमचा प्रवास हा आमच्यासाठी अविस्मरणीय असा आहे.

 

एक आई जशी आपल्याला बाळाला नेहमी जवळ करत असते तसंच झी मराठीने सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या आमच्या पर्वा नंतरदेखील आम्हाला अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे आमची कला सादर करण्याची संधी दिली त्यामुळे आमची या कार्यक्रमाशी असलेलं नातं अधिकचं दृढ होत गेलं आणि आता पुन्हा याच मंचावर ज्यूरीच्या भूमिकेतून आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आलो आहोत त्यामुळे एक वेगळी जबाबदारी आहे पण सगळ्यांचा आमच्यावर असलेला विश्वास पाहता आम्ही ती जबाबदारी नीट पार पडू अशी खात्री आहे. याच मंचावर पुन्हा एकत्र आल्यामुळे जुन्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतोय.  

आमच्या पर्वानंतर ३ ते ४ वर्ष आम्ही पाचही जण अनेक कार्यक्रमांसाठी एकत्र आलेलो. पण त्यानंतर सगळ्यांच्या वयक्तिक कारकिर्दीमुळे आमचं फारसं भेटणं झालं नाही. पण आता पुन्हा एकदा आम्ही लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत आणि आमच्या पर्वात आम्ही जेवढी धमाल केली तेवढीच धमाल आता आम्ही या पर्वात करतोय. ही भूमिका अतिशय जबाबदारीची भूमिका आहे. त्यामुळे आपलं ठाम मत असणं खूप महत्वाचं आहे. तसंच या पर्वात अनेक नवीन गाणी ऐकायला मिळतील तेव्हा त्याची तयारी आणि त्यावर स्पर्धकांना मार्गदर्शन करण्याकडे आमचा कल असेल.    

 या मंचामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदललं. अतिशय कमी वयात आमच्यातील कला तमाम रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. त्यांचं प्रेम आम्हाला मिळालं आणि इतकंच नव्हे तर अनेक दिग्गज मान्यवरांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले. या पर्वातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे आणि त्याचसोबत मी या मंचाकडून खूप काही शिकले. या कार्यक्रमाची विजेती होण्याचा बहुमान मला मिळाला आणि त्यामुळे माझं आयुष्यच बदलून गेलं. हे पर्व माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण पान आहे आणि या मंचामुळे माझं संगीत आणि जीवनमान उंचावलं तसंच मला एक ओळख मिळाली.