Join us  

'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 2:56 PM

शिवाजी पार्कवर दोन तास फेऱ्या मारत होता संकर्षण कऱ्हाडे

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) नेहमीच त्याच्या खास विनोदी शैलीने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतो. नुकतंच त्याने सध्याच्या राजकारणावर आणि निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केलेली एक कविता चांगलीच व्हायरल झाली. संकर्षणची ही कविता ऐकून थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) संकर्षणला शिवतीर्थावर बोलावले. राज ठाकरेंनी भेटायला बोलावलं म्हणल्यावर संकर्षणची काय धाकधूक झाली हे त्याने सांगितलं. 

संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी यांचा एकत्र कवितांचा कार्यक्रम असतो. याच कार्यक्रमात संकर्षणने जी राजकीय कविता सादर केली ती खूप गाजली. प्रत्येक मोबाईलवर संकर्षणची कविता पाहिली गेली. यानंतर राज ठाकरेंनी त्याला काल शिवतीर्थावर बोलवलं होतं. या भेटीचा किस्सा सांगताना संकर्षण म्हणाला, "मला राजसाहेबांचा फोन आला. ११ वाजता मला भेटायला ये असं ते म्हणाले. मी सकाळी साडेसात वाजताच मीरा रोडवरुन निघालो. 9 वाजता शिवाजी पार्क दादरला पोहोचलो. ११ वाजायच्या आधी अडीच तास मी तिथेच फेऱ्या मारत होतो.कारण माझ्या मनात धाकधुक होती की काय होणारे, ते काय म्हणणार आहेत. माझी तंतरली. मी त्यांच्या घरात गेल्यावर माझ्या फॅमिली ग्रुपवर मेसेज टाकला की मी पोहोचलो. तेव्हापासून माझे बाबा सारखे बीपीच चेक करत होते. मी हे जाऊन राज ठाकरेंना सांगितलं की अहो माझ्या घरच्यांना अगदी धडधडतंय. ते पण किती मिश्कील आहेत, मी जेव्हा त्यांच्या घरातून बाहेर पडलो तेव्हा ते जाताना म्हणाले, घरच्यांना सांगा सुखरुप निघालो." एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा किस्सा सांगितला. 

तो पुढे म्हणाला, "राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही तेव्हा होत्या. आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये कुठेही हे नव्हतं की असं का लिहिलं तसं का लिहिलं काहीही नाही. उलट तुझं काय चाललंय,नाटक कसं चाललंय, कुठे राहतोस, तुझ्या घरी कोण कोण असतं, सिनेमा, राजकारण, भारत, महाराष्ट्र अशा सगळ्या चर्चा त्यांनी आनंदाने केल्या."

राज ठाकरे यांचं कलेवरील प्रेम सर्वश्रूत आहे. कलाकारांचं कौतुक, त्यांना मदत करण्यासाठी ते कायम तत्पर असतात. अनेकदा कलाकारांचे कानही ओढतात. अनेकदा याचा प्रत्यय आला आहे.

टॅग्स :राज ठाकरेमराठी अभिनेताराजकारण