‘डान्स चॅम्पियन्स’मधून सनम जोहर-आबिगाईल पांडेने घेतली माघार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 16:20 IST
‘स्टार प्लस’वरील ‘डान्स प्लस’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली असून याच कार्यक्रमाची टीम ‘डान्स चॅम्पियन्स’ हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी ...
‘डान्स चॅम्पियन्स’मधून सनम जोहर-आबिगाईल पांडेने घेतली माघार!
‘स्टार प्लस’वरील ‘डान्स प्लस’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली असून याच कार्यक्रमाची टीम ‘डान्स चॅम्पियन्स’ हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे. आजवरच्या अनेक डान्स रिअॅलिटी शोमधील विजेते आणि उपविजेते प्रेक्षकांना यात पाहायला मिळत आहेत. डान्स चॅम्पियन कोण ठरणार यासाठी त्यांच्यात स्पर्धा रंगली आहे. अटीतटीच्या स्पर्धेत जो विजेता ठरेल, तो सर्वोत्कृष्ट नर्तक म्हणजेच डान्स चॅम्पियन ठरणार आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक खूप चांगले डान्सर असल्याने यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आठवडाभरातच या कार्यक्रमात पहिला अडथळा निर्माण झाला आहे. ‘नच बलिये’ या कार्यक्रमात उपविजेती ठरलेले सनम जोहर आणि त्याची प्रेयसी आबिगाईल पांडे यांची रेमो डिसोझाने या कार्यक्रमासाठी निवड केली होती. परंतु आता या कार्यक्रमासाठी चित्रीकरण सुरू करण्यापूर्वीच या जोडीने या कार्यक्रमातून माघार घेतली आहे.‘नच बलिये’तील एखाद्या जोडीने या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी या कार्यक्रमाच्या टीमची इच्छा होती. परंतु सनम जोहरला नुकतीच एक दुखापत झाली असून दुखापतीमुळे तो नृत्य करू शकत नाहीये. त्यामुळे त्याच्याऐवजी आता निर्मात्यांनी सुशांत खत्रीची निवड केली आहे. सुशांत हा डान्स प्लसमधील एक स्पर्धक होता. सनम आणि आबिगाईल यांनी या कार्यक्रमातून माघार घेतल्यानंतर या कार्यक्रमाच्या संकल्पनेत काहीसा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे दर आठवड्य़ाला नव्या आव्हानवीरची निवड केली जाणार आहे. याविषयी आबिगाईलने ‘मिरर’ वृत्तपत्राला सांगितले, “नृत्याच्या वेळी मला उचलण्याच्या प्रयत्नात सनमला दुखापत झाली आहे. त्याची पाठदुखीची समस्या जुनीच असून ती आता नव्याने सुरू झाली आहे. त्याच्या पाठीवर अद्याप बरीच सूज असून त्याला त्याचा खूप त्रासही होत आहे. तो चालू शकत असला, तरी नृत्यात आवश्यक असलेल्या अनेक बाबी आणि वजन उचलणे या गोष्टी तो करू शकत नाही. या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये आमचा समावेश होता; परंतु त्यानंतर आम्ही कार्यक्रमासाठी चित्रीकरण करू शकलो नाही.”Also Read : बिर राधा शेप्रा ठरला डान्स प्लस ३चा विजेता, विजेतेपद समर्पित केले या खास व्यक्तींना