समीर धर्माधिकारी झळकणार पेशवा बाजीराव मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2017 15:44 IST
समीर धर्माधिकारीने अनेक मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. निरोप या त्याच्या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याचसोबत ...
समीर धर्माधिकारी झळकणार पेशवा बाजीराव मालिकेत
समीर धर्माधिकारीने अनेक मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. निरोप या त्याच्या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याचसोबत त्याने अनेक हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तो सिंघम रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो यांसारख्या चित्रपटात झळकला आहे. त्याने आतापर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्ये ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत. झांसी की राणी, महाभारत, चक्रवर्ती अशोक सम्राट यांसारख्या मालिकेतील त्याच्या भूमिका गाजल्या आहेत आणि आता तो आणखी एका ऐतिहासिक मालिकेत झळकणार आहे.पेशवा बाजीराव ही मालिका सुरू होऊन काही दिवस झाले आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच या मालिकेत समीरची एंट्री होणार आहे. समीर या मालिकेत शाहू महाराजांची भूमिका साकारणार आहे.पेशवा बाजीराव ही मालिका लवकरच लीप घेणार असून लीपनंतर प्रेक्षकांना या मालिकेत समीरला पाहायला मिळणार आहे. समीर ही मालिका सुरुवातीपासून पाहात आहे. या मालिकेत बाजीराव पेशव्यांचा इतिहास खूप चांगल्याप्रकारे दाखवला जात आहे. तसेच या मालिकेचे चित्रण हे खूपच चांगल्याप्रकारे केले जात आहे असे त्याचे म्हणणे असल्याने त्याने या मालिकेसाठी होकार दिला. या मालिकेत शाहू यांची भूमिका साकारण्यासाठी समीरच योग्य आहे असे या मालिकेच्या टीमचे म्हणणे असल्याने त्यांनी समीरला या मालिकेसाठी विचारले. या भूमिकेसाठी समीरच त्यांची पहिली पसंती होता. त्याने सध्या या भूमिकेवर काम करायला सुरुवात केली आहे. ऐतिहासिक मालिकांमधील संवाद म्हणताना शब्दांचा उच्चार हा खूप वेगळा करावा लागतो. त्यामुळे सध्या तो यावर मेहनत घेत आहे.