अली असगर त्रिदेवियाँ मालिकेत आदिवासी महिलेच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 15:38 IST
अली असगरने इतिहास, कहानी घर घर की यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने चमत्कार, पार्टनर यांसारख्या चित्रपटांमध्येदेखील महत्त्वाच्या ...
अली असगर त्रिदेवियाँ मालिकेत आदिवासी महिलेच्या भूमिकेत
अली असगरने इतिहास, कहानी घर घर की यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने चमत्कार, पार्टनर यांसारख्या चित्रपटांमध्येदेखील महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. अली सध्या द कपिल शर्मा शोमध्ये झळकत आहे. द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाइट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात त्याने साकारलेल्या स्त्री भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत आणि आता तो त्रिदेवियाँ या मालिकेत झळकणार आहे. याही मालिकेत तो आपल्याला स्त्री वेशातच पाहायला मिळणार आहे. त्रिदेवियाँ या मालिकेत अली एका आदिवासी महिलेचे सोंग घेतलेल्या गुन्हेगाराच्या भूमिकेत दिसणार आहे. पोलिसांनी पकडू नये यासाठी तो आदिवासी जमातीसोबत राहात असल्याचे दाखवण्यात येणार आहे. चौहान कुटुंबिय जंगलात सहलीसाठी गेले असता त्यांची आणि अलीची ओळख होणार आहे. या ओळखीतूनच तो आता चौहान कुटुंबियांसोबत शहरात येणार आहे. याविषयी अली सांगतो, "मी माझ्या कारकिर्दीत अनेक वेळा स्त्री वेश धारण केला आहे. पण मी साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही एक वेगळी भूमिका आहे. या मालिकेत मी एक विनोदी भूमिका साकारत असून मी एका गुन्हेगाराच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. पोलिस माझा शोध घेत असून त्यांच्यापासून लपण्यासाठी मी आदिवासी स्त्रीचे रूप घेतले आहे. चौहान कुटुंबीयांशी माझी जंगलात गाठ पडणार आहे. या मालिकेत आदिवासी महिलेची भूमिका साकारायला मला खूप मजा येत आहे. या मालिकेचे कथानक खूप छान असून या मालिकेचा भाग व्हायला मी उत्सुक आहे. ही माझी नवी भूमिका माझ्या फॅन्सना प्रचंड आवडेल अशी मला खात्री आहे."