Join us  

प्रजासत्ताक दिन शाळेतल्या दिवसांची आठवण करून देतो - कृष्णा भारद्वाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 7:15 AM

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने छोट्या पडद्यावरील कलाकारांना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

   प्रजासत्ताक दिनानिमित्ताने छोट्या पडद्यावरील कलाकारांना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

स्मिता बन्सल - आज आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेले आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला अनेक तडजोडी कराव्या लागल्या आहेत, त्याची आठवण प्रजासत्ताक दिवस आपल्याला करून देतो, यामुळेच मला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. आपल्याला एका स्वतंत्र राष्ट्रात राहता येतं आहे. आपण दैनंदिन आयुष्यात इतके बिझी असतो की त्यासाठी दररोज आभार मानले जात नाहीत, हा दिवस त्याचीच आठवण करून देतो. आम्ही लहान होतो तेव्हा नेहमी प्रजासत्ताक दिनाची परेड पाहू याची काळजी माझे आई-वडिल घेत असत. त्यांच्यासाठी हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे, आम्हीही या परेडचा मनमुराद आनंद लुटायचो. झेंडा फडकताना पाहण्यासाठी आम्ही सकाळी लवकर उठून तयार व्हायचो आणि दूरदर्शनवर लागणारी भाषणं ऐकायचो. माझ्या मुलांनीही ते ऐकावे यासाठी मी प्रयत्न करत असते, पण आताशा ती परंपरा राहिलेली नाही. पण आमच्या बिल्डिंगमध्ये झेंडा वंदनाचा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमाला मुलींना आवर्जून घेऊन जाणे आणि त्यांना आपल्या देशाबद्दल बोलण्यासाठी प्रोत्साहन देणे हे मी करतेच. आता माझ्या मुली जे बोलताहेत त्याचा अर्थ त्यांना कळत नसेलही. पण त्या जेव्हा मोठ्या होतील तेव्हा या गोष्टीबद्दल त्यांना माहिती असणे गरजेचे आहे, भारतासारख्या स्वतंत्र राष्ट्राचे नागरिकअसण्याचं सामर्थ्य काय आहे याची त्यांना तेव्हा जाणीव होईल. या एकाच दिवशी आमच्या संपूर्ण कुटुंबाला सुट्टी असते आणि या दिवशी आम्ही सर्वजण एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो.

 

नीलू कोहली- आम्ही प्रजासत्ताक दिनी शूट करत नाही, आमची सुट्टी असते यादिवशी. `जबाबदारीने स्वातंत्र्याचा आनंद लुटा’ ही माझी प्रजासत्ताकदिनाची संकल्पना आहे. जागरूक नागरिक होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले आणि अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपले लहानसे का होईना योगदान दिले, तर आपला देश अधिक समृद्ध होईल. एक साधेसेच उदाहरण बघा ना, आपल्यापैकी प्रत्येकाने इकडे तिकडे कचरा फेकण्यापेक्षा एक पिशवी कचऱ्यासाठी जवळ बाळगळी तर किती बरं होईल, इतकंच नाही तर याबद्दल प्रत्येकाला सांगणेही तितकेच गरजेचे  आहे. याबरोबरच मला रांगेचे नियम पाळणं जास्त गरजेचं वाटतं, रांगेत उभ्या असलेल्या लोकांचा आदर न करणे मला अजिबात आवडत नाही. आपल्या देशाचे जबाबदार नागरिक होण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे.

निखिल खुराना - लहानपणापासून मी लष्करी भागात वाढलो आहे. आमच्या शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम असायचा, मग सर्व मुले परेड करायची आणि त्यांच्यासाठी अल्पोपहार असायचा. प्रत्येक शाळेत तीन ते चार तास प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम असायचे. आम्ही खूप मजा करायचो, या दिवशी अभ्यासही नसायचा, नुसती धमाल करायचो आम्ही. मला सगळ्या लोकांना हेच सांगावसे वाटते, की कोणत्याही स्तरावर आपल्यात फूट पडू देऊ नका, एकत्रित राहा आणि जीवनाचा आनंद लुटा.

कृष्णा भारद्वाज- प्रजासत्ताक दिन मला नेहमीच माझ्या शाळेतल्या दिवसांची आठवण करून देतो. आमच्या आजूबाजूला सकाळपासून देशभक्तीपर गाणी लावली जायची, लोक पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे आणि शाळेत जाताना झेंडावंदन झाल्यावर झेंड्याखाली ठेवण्यासाठी आम्ही फुले न्यायचो. या दिवशी होणाऱ्या अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही सहभागी व्हायचो, खास करून प्रमुख पाहुण्यांसमोर नृत्य आणि गाणी सादर करायचो. या दिवशी आम्ही खूप धमाल करायचो आणि वर्षभर मी या दिवसाची वाट पाहायचो.

अर्चना पुरन सिंह - १९५० सालापासून २६ जानेवारी हा दिवस आपल्या भारतीयांसाठी फारच खास आहे, या दिवशी भारताने नवीन संविधान स्वीकारले आणि आपला देश गणराज्य झाला. आम्ही शाळेतले विद्यार्थ्यी होतो, तेव्हापासून या खास दिवशी आम्ही टीव्हीवर राजपथावर होणारी परेड पाहायचो, प्रेरणादायी भाषणे ऐकायचो आणि मिठाई वाटायचोय या वर्षी आपण ६९वा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहोत, हा दिवस साजरा करताना मी जो अभिमान अनुभवला आहे, तोच अभिमान माझ्या मुलांना अनुभवायला शिकवू शकेन आणि आनंद घ्यायला शिकवू शकेल अशी मला आशा वाटतो. या दिवशी आम्ही सर्वजण एकत्र बसून टीव्हीवर परेड पाहणार आहोत. आपल्या मुलांमध्येही परेडमुळे देशाभिमान आणि प्रेरणादायी भाषणांमुळे प्रोत्साहन पेरले जाणार आहे. मी आणि माझा नवरा आम्ही नेहमीप्रमाणे एकत्रितपणे प्रजासत्ताकदिनी हा कार्यक्रम पाहणार आहोत, आमची मुलंही ही परंपरा पुढे सुरू ठेवतील अशी आशा वाटते. जय हिंद! जय भारत!

 

टॅग्स :सोनी सबप्रजासत्ताक दिन