Join us  

रामायणमधील कौशल्या आणि दशरथ ख-या आयुष्यात आहेत पती-पत्नी; आता असे दिसतात दशरथ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 3:24 PM

‘रामायण’ मालिकेत राजा दशरथ यांची भूमिका साकारणारे अभिनेते कोण, तुम्हाला ठाऊक आहे?

ठळक मुद्दे त्यांना रामायणातील राजा दशरथाची भूमिका कशी मिळाली, याची कथाही रंजक आहे.

 रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या अपार लोकप्रिय मालिकेत प्रभु रामाच्या पित्याची अर्थात राजा दशरथ यांची भूमिका साकारणारे अभिनेते कोण होते, सध्या काय करतात, हे तुम्हाला ठाऊक आहे? तर आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहोत.रामायणात रामाच्या पित्याची भूमिका साकारणारा अभिनेता एक मराठमोळा अभिनेता आहे. होय, बाळ धुरी त्यांचे नाव. 1944 साली महाराष्ट्रात त्यांचा जन्म झाला. 

त्यांचे खरे नाव भैय्यूजी. मात्र घरी सगळेजण त्यांना बाळ नावाने हाक मारत. पुढे त्यांनी हेच नाव धारण केले. बाळ धुरी यांना लहानपणापासूनच अभिनयात रस होता. पण त्यांच्या कुटुंबीयांचा मात्र यास विरोध होता.

घरच्यांच्या इच्छेखातर त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली. या पदवीनंतर लगेच त्यांना चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. पण बाळ यांना त्यांच्या अंगातील कलागुण त्यांना स्वस्थ बसू देईना. मग काय, बाळ यांनी घरच्यांच्या कठोर विरोध डावलून नोकरीला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ अभिनय करण्याचा निर्णय घेतला. 70 च्या दशकात ‘देवाचिया द्वारी’ या मराठी सिनेमातून त्यांनी अभिनयात पदार्पण केले.

 

करिअरच्या सुरुवातीला त्यांनी 30 पेक्षा अधिक नाटकांत काम केले. त्यांना रामायणातील राजा दशरथाची भूमिका कशी मिळाली, याची कथाही रंजक आहे.

रामायणात भगवान रामाची माता अर्थात माता कौशल्याची भूमिका मराठी अभिनेत्री जयश्री गडकर यांनी साकारली होती. मराठी चित्रपटसृष्टीत जयश्री गडकर यांचे मोठे नाव होते. त्यामुळे रामानंद सागर यांनी कौशल्येच्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली होती. रामानंद सागर यांना भेटायला जयश्री गडकर गेल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती होते. म्हणजे कोण, तर बाळ धुरी. होय, बाळ धुरी हे जयश्री गडकर यांचे रिअल लाईफ पती होते. बाळ यांना पाहून रामानंद सागर यांनी त्यांनाही दोन भूमिका ऑफर केल्यात. एक होती मेघनादची आणि दुसरी राजा दशरथाची. यातील राजा दशरथाची भूमिका साकारण्याची इच्छा बाळ यांनी व्यक्त केली. खरे तर ही भूमिका लहान होती. पण तरीही त्यांनी हीच भूमिका निवडली.

रामायणातील एका सीनमध्ये राजा दशरथाच्या मृत्यूनंतर त्यांना चितेवर दाखवण्यात येणार होते. जयश्री आपल्या पतीला चितेवर पाहू शकत नव्हत्या. त्यामुळे या सीनला त्यांनी विरोध केला होता. पण खुद्द बाळ यांनी समजवल्यानंतर कुठे त्या मानल्या होत्या.

1975 साली प्रसिद्ध अभिनेते बाळ धुरी यांच्यासोबत जयश्री गडकर विवाहबद्ध झाल्या. लग्नानंतरसुद्धा त्यांनी अभिनय सुरु ठेवला. बाळ धुरी यांच्यासोबतही त्यांनी काही चित्रपटांत भूमिका केल्या. जयश्री गडकर यांनी 29 ऑगस्ट 2008 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. हृदयविकारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

टॅग्स :रामायण