Join us  

राजेश श्रृंगारपुरे झळकणार या ऐतिहासिक मालिकेत, साकारणार मल्हारराव होळकरांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 10:19 PM

पुण्यश्लोक अहिल्याबाई ही ऐतिहासिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई ही ऐतिहासिक मालिका लवकरच सोनी एण्टरटेन्मेंट दाखल होणार आहे. ‘अहिल्याबाई होळकर’ यांच्या अद्वीतीय जीवनावर आधारित ही मालिका १८व्या शतकातील इतिहास सांगते. अहिल्याबाईंनी आपले सासरे, मल्हारराव होळकर यांच्या पाठिंब्याने समाजात प्रचलित पितृसत्ताक रुढींचा हिरीरीने विरोध केला आणि लोकांच्या व विशेषतः महिलांच्या कल्याणासाठी समारात्मक योगदान दिले. अहिल्याबाईंच्या सार्थक जीवनाची ही शौर्यगाथा  आहे, जी तिच्या सासर्‍यांच्या म्हणजे मल्हारराव होळकरांच्या मार्गदर्शनाशिवाय शक्य होऊ शकली नसती. हे सर्वश्रुत आहे की, मल्हारराव एक पराक्रमी सरदार होते. राज्य चालवण्याची त्यांची पद्धत वेगळीच होती. हे विराट व्यक्तिमत्व साकार करण्यासाठी सुप्रसिद्ध टीव्ही कलाकार राजेश शृंगारपुरे याला घेण्यात आले आहे. या अभिनेत्याने मराठी तसेच बॉलीवूड आणि टेलिव्हिजनच्या माध्यमात खूप वेगवेगळ्या प्रकारचे काम केलेले आहे.  या मालिकेचा एक भाग होत असल्याचा आनंद व्यक्त करताना राजेश शृंगारपुरे म्हणाला, “ही मालिके अनेक प्रकारे माझ्यासाठी विशेष आहे. मी माझ्या कारकिर्दीत काही पौराणिक भूमिका केलेल्या आहेत, पण इतके पराक्रमी ऐतिहासिक व्यक्तिमत्व साकारण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. मला जेव्हा मल्हारराव या भूमिकेसाठी विचारण्यात आले, तेव्हा त्या भूमिकेने मला लगेच आकृष्ट केले. हे एक दूरदर्शी व्यक्तित्व आहे. मल्हारराव समाजातील सर्व पितृप्रधान रुढींच्या विरुद्ध लढले आणि आपली सून अहिल्याबाई हिच्या पाठीशी उभे राहून एक उदाहरण घालून दिले. भारतीय इतिहासातील एक अजरामर शासक मल्हारराव यांचा वारसा कथारूपाने सादर करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य मानतो.”

पुण्यश्लोक अहिल्याबाई ही नविन मालिका ४ जानेवारीपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पहायला मिळणार आहे.

टॅग्स :राजेश श्रृंगारपुरे