Join us  

​राहुल वैद्य करणार म्युझिक की पाठशाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 9:28 AM

म्युझिक की पाठशाला हा सिंगिंग रिअॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमात लहान मुले आपल्या गायनकलेने लोकांचे ...

म्युझिक की पाठशाला हा सिंगिंग रिअॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमात लहान मुले आपल्या गायनकलेने लोकांचे मनोरंजन करणार आहेत. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वैद्य करणार आहे. इंडियन आय़डल या कार्यक्रमामुळे राहुल वैद्य लोकांच्या घराघरात पोहोचला होता. इंडियन आयडलच्या पहिल्या सिझनचे विजेतेपद अभिजीत सावंतला मिळाले होते. पण तरीही या सिझनमधील राहुल वैद्यला देखील या कार्यक्रमामुळे चांगलेच फॅन फॉलॉविंग मिळाले. कोणताही रिअॅलिटी शो म्हटला की त्यात परीक्षक हे येतातच. या कार्यक्रमात दर आठवड्याला वेगवेगळे परीक्षक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. दर आठवड्याला एक सेलिब्रिटी जज या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमात कोणताही स्पर्धक बाद होणार नाहीये. कोणत्याही बाद करण्याच्या प्रक्रियेशिवाय शिकवण्याचा आनंद प्रेक्षकांना या मालिकेद्वारे मिळणार आहे. या कार्यक्रमाविषयी राहुल वैद्य सांगतो, या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर परतण्याचा मला एक वेगळाच आनंद मिळत आहे. म्युझिक की पाठशाला या कार्यक्रमाविषयी मी खूप उत्सुक आहे. गेल्या काही वर्षांत छोटा पडदा खूप बदलला आहे. छोट्या पडद्यामुळे खूप चांगले व्यासपीठ आजच्या मुलांना मिळत आहे. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे या कार्यक्रमात स्पर्धकांना मार्गदर्शन लाभणार आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमातून कोणताही स्पर्धक बाद होणार नसल्यामुळे सहभागींना आरामदायी वातावरणात संगीत शिकता येणार आहे आणि प्रशिक्षकांसोबत संगीताचा आनंद घेता येणार आहे. जो जिता वही सुपरस्टार या कार्यक्रमातदेखील राहुलने अनेक दमदार परफॉर्मन्स दिले आहेत. म्युझिक की पाठशाला या कार्यक्रमात तो सूत्रसंचालनाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असला तरी त्याची सूत्रसंचालनाची ही पहिलीच वेळ नाहीये. झुम इंडिया, आज माही वे यांसारख्या कार्यक्रमाचे त्याने सूत्रसंचालन केले आहे. तसेच तो म्युझिक का महामुकाबला या कार्यक्रमात देखील झळकला होता. आजवर त्याचे अनेक अल्बम्स आले असून त्याच्या अल्बमला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एवढेच नव्हे तर जान ए मन, शादी नं १, रेस २, ऑल इज वेल यांसारख्या हिंदी चित्रपटांसाठी तो गायला आहे. तसेच जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या मराठी चित्रपटात देखील त्याने एक गाणे गायले आहे. Also Read : 'बाहुबली' सिनेमाचा हा गायक गाजवणार इंडियन आयडल?