Join us  

“सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर” च्या ऑडिशन्सला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 3:38 PM

“सूर नवा ध्यास नवा – छोटे सुरवीर” या कार्यक्रमाच्या ऑडीशन्स संपूर्ण महाराष्ट्रात पार पडत आहेत. पुणेकरांनी कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला उदंड प्रतिसाद दिला.

ठळक मुद्दे सूर नवा ध्यास नवाचे मागील पर्व हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले

कलर्स मराठी वरील “सूर नवा ध्यास नवा – छोटे सुरवीर” या कार्यक्रमाच्या ऑडीशन्स संपूर्ण महाराष्ट्रात पार पडत आहेत. रत्नागिरी, कोल्हापूर नंतर पुण्यामध्ये या ऑडिशन्स नुकत्याच पार पडल्या. पुणेकरांनी कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला उदंड प्रतिसाद दिला. मुलांचा उत्साह आणि त्यांची तयारी वाखाणण्याजोगी होती. सगळीच मुलं प्रचंड तयारीने आली होती हे त्यांच्या गाण्यावरूनच कळत होते. कार्यक्रमाच्या ऑडिशन्समध्ये ५०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. पुणे येथील इ. एस. सेकंडरी स्कूल, ४८६ सदाशिव पेठ, न्यू इंग्लिश स्कूल कॅम्पस, टिळक रोड येथे या ऑडिशन्स पार पडल्या. या कार्यक्रमाचा शुभारंभ ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत आपल्या सगळ्यांचा लाडका अवधूत दादा, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे सध्या गुलदसत्यात आहे. सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या पुणे केंद्रावर पार पडलेल्या निवड चाचणीतून मुंबईतील मेगा ऑडीशन्ससाठी आठ स्पर्धक निवडण्यात आले. श्रीनिधी देशपांडे, नंदिनी गायकवाड, ईशिता मोडक, अक्षय चारभाई, धिरज शेगर, चैतन्य देवडे, आदी भारतीया आणि अभिषेक कांबळे यांची निवड झाली आहे.    

पुणे ऑडिशन्सला आलेल्या बऱ्याच स्पर्धकांनी त्यांच्या उत्तम सादरीकरणामुळे मने जिंकली परंतु या आठ स्पर्धकांना मुंबईला येऊन मेगा ऑडिशन्स मध्ये त्यांचे गाणे सादर करण्याची संधी मिळाली. चैतन्य देवडे याने माझी मैना गावाकडे राहिली, अक्षय चारभाई याने लाजून हसणे हे गाणं सादर केले आणि उपस्थितांची वाहवा मिळवली. तसेच नंदिनीने देखील तिच्या अप्रतिम गाण्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आता ऑडीशन्स नागपूर मध्ये रंगणार आहे. सूर नवा ध्यास नवाचे मागील पर्व हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले त्या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. हे पर्व छोटे सुरवीर गाजवणार हे नक्की. या बालगोपाळांचे सुरेल गाणं ऐकायला संपूर्ण महराष्ट्र आतूर आहे.

टॅग्स :कलर्स मराठीसंगीत