Join us  

मेरे साई या मालिकेद्वारे मांडली जाणार पाणी टंचाईची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 11:04 AM

प्रदूषण आणि लोकसंख्या विस्फोटामुळे जगभरात मानवांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या मेरे साई या मालिकेद्वारे ...

प्रदूषण आणि लोकसंख्या विस्फोटामुळे जगभरात मानवांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या मेरे साई या मालिकेद्वारे या गोष्टीवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. साई बाबांची भूमिका साकारणारा अभिनेता अबीर सुफी याने त्याच्या आयुष्यात पाणी टंचाईची समस्या जवळून अनुभवली आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा त्याने उत्तर भारतातील एका मित्राच्या घरी भेट दिली होती, तेव्हा त्याला जाणवले होते की, पाणी टंचाईमुळे त्यांचे सर्वांचे आयुष्य खडतर बनले आहे. एका व्यक्तीला एका बादली पाण्यात संपूर्ण दिवसाचे काम करावे लागत आहे. याविषयी अबीर सांगतो, "मी उत्तर प्रदेश येथे गेलो असता मला तिथल्या लोकांची अवस्था पाहून खूप वाईट वाटले होते. आपण नशिबवान आहोत आपल्याकडे दैनंदिन वापरासाठी भरपूर पाणी आहे. गाव आणि दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी पाणी मिळवणे ही एक लढाई आहे. लोक त्यांची दिवसभरातील सगळी कामे केवळ एका बादलीभर पाण्यात करतात हे बघून मला खूप आश्चर्य वाटले होते. एखाद्या कुटुंबात एखादी व्यक्ती किंवा मूल आजारी असेल आणि त्यामुळे त्यांना पाणी भरणे शक्य नसेल तर ते दिवस कसा घालवत असतील हा नुसता विचार करून देखील खूप त्रास होतो. महाराष्ट्रातही अनेक गावांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. या दुष्काळाचा शेतीवर देखील परिणाम होतो. मेरे साई या मालिकेमध्ये शिर्डीला कसा पाणी टंचाईचा सामना करावा लागला आणि त्याचा लोकांवर कसा परिणाम झाला आणि साईंनी या परिस्थिवर मात करण्यासाठी लोकांची कशाप्रकारे मदत केली हे दाखवण्यात येणार आहे. माझ्या मते, आपण सर्व देशवासियांनी जल संरक्षण उपाय स्वीकारणे गरजेचे आहे. मेरे साई या मालिकेत पुढील भागात दाखवले जाणार आहे की, साईंच्या दर्शनासाठी जवळील गावातील लोक मोठ्या प्रमाणात द्वारकमाई येथे आल्यामुळे तिथे पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे. अहमदनगर हा दुष्काळग्रस्त प्रदेश असल्याने तिथल्या लोकांना पाणी भरण्यासाठी दूरवर जावे लागते. आता साई आपल्या भक्तांची तहान कशी भागवेल? द्वारकामाईंच्या पाण्याची समस्या सुटेल का? अशी उत्तरे प्रेक्षकांना मालिकेत मिळणार आहेत. मालिकेद्वारे पाणी बचत करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. Also Read : मेरे साई या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी या कारणामुळे सुप्रिया पिळगांवकर झाल्या होत्या भावुक