Join us

प्रीतम आहे या गोष्टीच्या शोधात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 13:58 IST

लवकरच ‘दिल है हिंदुस्तानी’ या कार्यक्रमाचा दुसरा सिझन येणार आहे.या कार्यक्रमात भारतीय संगीताला महत्त्व देण्यात येते आणि त्यातील सर्वोत्कृष्ट ...

लवकरच ‘दिल है हिंदुस्तानी’ या कार्यक्रमाचा दुसरा सिझन येणार आहे.या कार्यक्रमात भारतीय संगीताला महत्त्व देण्यात येते आणि त्यातील सर्वोत्कृष्ट गायकाच्या किताबासाठी जगभरातून स्पर्धक भाग घेतात.या कार्यक्रमाच्या परीक्षक मंडळात नामवंत गायक बादशहा,पार्श्वगायिका सुनिधी चौहान आणि संगीतकार प्रीतम यांचा समावेश आहे.अनेक भाषांतील गीतांना ज्याने लोकप्रिय संगीत दिले आहे, असा संगीतकार प्रीतम या कार्यक्रमात आपल्या भावी प्रकल्पासाठी नव्या गायकाचा शोध घेणार आहे.यात निवड झालेल्या स्पर्धकाना प्रीतमने ध्वनिमुद्रित केलेल्या स्वरसाजावर गीत गाण्यास सांगितले जाईल आणि प्रीतमच्या कंपनीबरोबर त्याचा एक वर्षाचा करारही केला जाईल, असे सांगितले जाते.बॉलिवूडमधील गाण्यांसाठी प्रीतम नव्या गायकाचा शोध घेत आहे.प्रीतमने यासंदर्भात सांगितले, “दिल है हिंदुस्तानी’ या कार्यक्रमात केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील विविध गायक एकाच व्यासपिठावर आपली कला सादर करतात. त्यावेळी आम्हाला अनेक प्रकारचे आवाज ऐकायला मिळतात. अशा या कार्यक्रमात एक परीक्षक म्हणून काम करण्यास मी खूपच उत्सुक झालो आहे. तसंच यामुळे मला माझ्या भावी प्रकल्पासाठी नवा दर्जेदार गायकही मिळू शकेल. खरं तर या चित्रपटसृष्टीत तसा मीसुध्दा एक बाहेरचाच माणूस आहे. त्यामुळे या क्षेत्रात जम बसविणं किती अवघड असतं, त्याची मला कल्पना आहे. म्हणूनच या क्षेत्राबाहेरील गुणवान गायकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. मी एका आगळ्या आवाजाच्या शोधात आहे.एकदा मला तो आवाज सापडला की माझी टीम त्याला माझ्या प्रोजेक्टसाठी तयार करणार आहे.”आता या कार्यक्रमात रसिक प्रेक्षकांना मधूनच सुखद आश्चर्याचा धक्का देण्याची आयडीयाची कल्पना निर्मात्यांनी आखली असल्याचे माहिती मिळते आहे.या कार्यक्रमाच्या मंचावर बादशहा दोन प्रसिध्द पंजाबी गायकांना आमंत्रित करणार आहे.ज्या गायकाने पंजाबी रॅप संगीत हिंदी चित्रपटात आणले तो यो यो हनिसिंग आणि अलीकडच्या काळात अनेक गाजलेल्या उडत्या चालीच्या गीतांमधील आवाज म्हणजेच गुरु रंधावा. हे दोन लोकप्रिय गायकही जजच्या खुर्चीत बसतील.सूत्रांनी सांगितले की,“बादशहा आणि हे दोन पंजाबी गायक आपल्या गाजलेल्या गाण्यांने सा-यांचे मनोरंजन तर करतीलच आणि त्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांना योग्य ते मार्गदर्शनही करतील.या कार्यक्रमात सर्वांना एकाच मंचावर एकत्र आलेले पाहणे फारच रंजक आणि जोशपूर्ण असणार हे मात्र नक्की. या तिघांच्या एकत्र येण्यामुळे या कार्यक्रमाचा दर्जाही निश्चितच उंचावणार आहे.” हे तिघे एकत्र गाताना व्यासपिठावर ठेकेदार संगीताचा जल्लोष होईल.