Join us

​एकाव्वन या मालिकेत प्राची तेहलान दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 17:01 IST

प्राची तेहलानने दिया और बाती हम या मालिकेत आरझूची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद ...

प्राची तेहलानने दिया और बाती हम या मालिकेत आरझूची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेनंतर ती काही चित्रपटांमध्ये देखील झळकली होती. आता ती पुन्हा छोट्या पडद्याकडे वळली असून ती स्टार प्लस वाहिनीवरील एका मालिकेत लवकरच झळकणार आहे. प्राची ही अभिनेत्री बनण्यापूर्वी प्रसिद्ध बास्केट बॉल खेळाडू होती. तिच्या नेट बॉल टीमने तर कॉमनवेल्थ गेममध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ती त्या टीमची कॅप्टन होती. खेळात तिचे चांगले करियर सुरू असतानाच तिला शशी सुमीत प्रोडक्शन हाऊसकडून अभिनयाची ऑफर मिळाली. या मालिकेत तिला ऑफर करण्यात आलेली भूमिका तिला आवडल्याने ती या क्षेत्राकडे वळली. एकाव्वन नावाची एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत एका घरात एकावन्न मुले असून प्राची ही त्यांची एकावन्नावी मुलगी असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकावन्न हा नंबर कधीही शुभ मानला जातो आणि त्यामुळे ती देखील तिच्या घरासाठी शुभच असेल असेच सगळ्यांना वाटत होते. पण तिच्या जन्मानंतर घरात अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात आणि या सगळ्यातून पुढे काय काय होते हे प्रेक्षकांना एकाव्वन या मालिकेत पाहायला मिळणार आहे. एकावन्न या मालिकेची निर्मिती सुझाना घई करणार असून पॅरोनामा प्रोडक्शनची ही मालिका आहे. या प्रोडक्शन हाऊसने आजवर अनेक हिट मालिका दिल्या आहेत. सुहानी सी एक लडकी, हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे यांसारख्या त्यांच्या मालिका प्रचंड गाजल्या आहेत. एकाव्वन ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेत छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध चेहेरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.प्राचीने मालिकेसोबत काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अर्जन, बेलारस यांसारख्या पंजाही चित्रपटातही तिने काम केले आहे. तसेच तिने डोअर या तामिळ चित्रपटाचे चित्रीकरण देखील पूर्ण केले आहे.