Join us  

चरित्र भूमिका साकारायला आवडेल -पूनम कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 6:29 PM

अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना फक्त आवड, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात पाय रोवलेली पूनम कुलकर्णी आज विविधांगी नाटकांद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झाली आहे.

- रवींद्र मोरे 

अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना फक्त आवड, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात पाय रोवलेली पूनम कुलकर्णी आज विविधांगी नाटकांद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे तिला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे अनेक राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. पूनमने काही मालिकांमध्ये छोट्याखानी भूमिकाही साकारल्या आहेत. एकंदरीत तिच्या आजपर्यंतच्या प्रवासाबाबत तिच्याशी साधलेला हा संवाद...

* अभिनय क्षेत्रात काम करण्याची आवड कशी निर्माण झाली?-  तसं पाहिलं तर संपूर्ण घराण्यात अभिनयाचा आणि नाट्यकलेचा वारसा असा कुणाकडूनही नाही. पण रसिक मन मात्र नक्कीच आहे. शाळा कॉलेज मधील विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहताना जाणवायचे की हे सारं आपणही करू शकतो. मग उत्तरोत्तर अभिनयाची नाट्यकलेची आवड वाढतच गेली.

* अभिनय क्षेत्रात करिअर घडविताना आलेल्या अडचणींवर कशी मात केली?- इंजिनीरिंग पूर्ण झाल्यावर मात्र मी अभिनयकडे अधिक गंभीरपणे पाहू लागले आणि योग्य संधी आणि गुरू  शोधू लागले. पण भरमसाठ फी शिवाय शिकवणारे शोधूनही सापडत नव्हते. तस टीव्ही मालिकांमध्ये प्रयत्न केला, त्यासाठी स्ट्रगल केला, आॅडिशन्सही दिल्या पण नाटक शिकायची खूप मनापासून इच्छा होती आणि खूप साºया ठिकाणी तुम्हाला थिएटर एक्सपिरीयन्स आहे का हे विचारले जायचे. मलाही नाटकात काम करायचेच होते त्याचवेळी सुदैवाने एका नाट्यसंस्थेत प्रवेश मिळाला आणि खºया अर्थाने माझं नाट्य शिक्षण सुरू झाले... आणि फुलले देखील.  

* या क्षेत्रातील तुमचे प्रेरणास्थान कोण आणि त्यांच्याकडून आपणास काय शिकवण मिळाली?- माझे प्रेरणा स्थान माझे वंदनीय गुरुवर्य श्री. सुरेश शांताराम पवार आहेत. त्यांच्या सर्वंकष मार्गदर्शनामुळे व काम करून घेण्याचा वृत्तीमुळेच मला आज सातत्याने राज्यस्तरीय अशा विविध स्पर्धांमधून सर्वोत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पुरस्कार मिळालेत. अगदी मुळापासून नाटक शिकवावे ते सरांनीच. प्रत्येक शब्दावर वाक्यावर मेहेनत करवून घेतात शिवाय वाक्याचे आरोह अवरोह, फुटवर्क, हातवारे, हावभाव ह्या सगळ्यांचा अगदी बारीक सराव करुन घेतात. सर नेहमी एक गोष्ट सांगतात की, आपण रंगकर्मी होण्यापूर्वी एक चांगले रंग रसिक (नाट्यरसिक) होणं जास्त गरजेच आहे. हीच खूप मोठी शिकवण आहे सरांची.

* चित्रपटात संधी मिळाल्यास कोणत्या प्रकारची भूमिका साकारायला आवडेल?- मला सतत एकच छाप पडून न घेता वेगवेगळ्या भूमिका साकारायला नक्कीच आवडेल. खरं सांगायचे तर मला चरित्र भूमिका साकारायला आवडेल.

* सध्या नाटकांचे व्यासपीठ काही प्रमाणात कालबाह्य होत चाललंय, याबाबत काय सांगाल?- नाटकाचे व्यासपीठ कालबाह्य होत चाललंय असे नाही म्हणता येणार. हो, थोडी शिथिलता जरूर आलीये. विनोदी फार्सीकल याला हसत पसंती मिळतेय खरी... पण तुम्ही दर्जेदार नाटक दिलेत तर त्यालाही प्रचंड पसंती मिळतेच आहे. आपला विषय व सादरीकरण चोख असेल तर त्याला हमखास पसंती देणारा नाट्य रसिक जरूर आहे. गेल्या ६-८ महिन्यात तर खूप सुंदर आणि वेगवेगळ्या विषयांवरील नाटक रंगभूमीवर आले आणि प्रेक्षकांनी ही त्याला भरभरून प्रतिसाद दिलाय.

* या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या  नवोदित कलाकारांना काय संदेश द्याल?- मुळात संदेश देण्याइतकी मी अजून प्रगल्भ नाहीये. बस आपलं ध्येय निश्चित करा. ते मिळवण्याचं नियोजन करा केलेल्या नियोजनाप्रमाणे नॉनस्टॉप मेहेनत करा व जास्तीत जास्त नम्र राहून, सर्वंकष असं निरिक्षण करत राहा. यशाला मेहनतीशिवाय पर्याय नसतो. सर्वात महत्त्वाचं जमेल तेवढ साहित्य वाचा आणि विविधांगी नाटक सिनेमे पहा. कारण जेवढे तुम्ही पाहाल तेवढे जास्त शिकाल. 

टॅग्स :टेलिव्हिजनमुलाखत