Join us  

पल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 11:13 AM

पल्लवी जोशीने अनेक हिंदी, मराठी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. पण नुकतीच ती एका शॉर्ट फिल्ममध्ये झळकली होती. तिच्या ...

पल्लवी जोशीने अनेक हिंदी, मराठी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. पण नुकतीच ती एका शॉर्ट फिल्ममध्ये झळकली होती. तिच्या प्रेशर कुकर या शॉर्ट फिल्मची चांगलीच चर्चा रंगली होती. या शॉर्ट फिल्मला अनेक पुरस्कार सोहळ्यात नामांकनं देखील मिळाली होती. या तिच्या शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा...तू चित्रपट, मालिकांमध्ये अनेक वर्षं काम केले आहेस. शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?मी याआधी कधीच शॉर्ट फिल्ममध्ये काम केलेले नव्हते. शॉर्ट फिल्ममध्ये जे काही तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे ते त्या ठरावीक मिनिटांतच सांगायचे असते त्यामुळे या माध्यमाची एक वेगळी गंमत आहे असे मला वाटते. चित्रपट, मालिका ही देखील दोन वेगेवेगळी माध्यमं आहेत. या सगळ्या माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव हा खूपच वेगळा असतो.प्रेशर कुकर या शॉर्ट फिल्मचा विषय काय आहे आणि या शॉर्टफिल्ममध्ये काम करण्याचा तू विचार कसा केलास?प्रेशर कुकरची गोष्ट ही अतिशय साधी आहे. आपल्या जुन्या प्रेशर कुकरला कंटाळलेल्या एका गृहिणीची ही कथा आहे. हा प्रेशर कुकर आणि तिचे आयुष्य याच्यात काय साम्य आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने या शॉर्ट फिल्ममध्ये मांडण्यात आले आहे. ही कथा अतिशय चांगली असल्याने मी या शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याचा विचार केला. या शॉर्टफिल्मचा काळ हा नव्वदीच्या दशकातील आहे. आपल्या वस्तू जपून ठेवणारे लोक आज खूपच कमी प्रमाणात पाहायला मिळतात. पण त्या काळात लोक आपल्या प्रत्येक वस्तूशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असायचे. त्यामुळे या शॉर्ट फिल्मचा काळ हा तेव्हाचा आहे. ही शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीस येऊन काही दिवस झाले आहेत. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद या शॉर्ट फिल्मला मिळत असून माझ्या फॅन्सना ही शॉर्ट फिल्म आवडत असल्याचे ते मला आवर्जून सांगत आहेत.या प्रेशर कुकरप्रमाणे तुला तुझी कोणती वस्तू अगदी जवळची वाटते का?मी लहानपणापासून चित्रपटांमध्ये काम करत आहे. लहानपणी मी घरी असली की माझा कप हा ठरलेला असायचा. पण मी चित्रीकरणासाठी आऊटडोरला गेली की, मला तिथला कप वापरायला लागायचा. त्यावेळी मी माझ्या कपला खूप मिस करायचे. मी त्या कपशी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्या कपचा कान देखील थोडासा खराब झाला होता. पण तरीही त्या कपला फेकून द्यायला मी तयार नव्हते. तू आज इतकी वर्षँ इंडस्ट्रीत काम करत आहेस, इंडस्ट्रीत किती बदल झाला असे तुला वाटते?आज इंडस्ट्रीत तांत्रिकदृष्ट्या अनेक बदल घडले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे आले आहेत. तांत्रिकदृष्ट्या आपण खूपच प्रगती केली आहे. तसेच नवनवीन विषय चित्रपट, मालिका, वेबसिरिज या तिन्ही माध्यमांमध्ये हाताळले जात आहेत. Also Read : पल्लवी जोशी प्रेक्षकांना दिसणार एका वेगळ्या भूमिकेत