Join us  

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीने शेअर केले एक गुपित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2017 6:12 PM

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नेहमीच मकरसंक्राती हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी या मालिकेत ...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नेहमीच मकरसंक्राती हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी या मालिकेत गोकुळधामवासीय पंतग उडवण्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. केवळ पुरुषच नाही तर स्त्रियादेखील या मालिकेत पतंग उडवतात. प्रेक्षकांची लाडकी दयादेखील मालिकेत पतंग उडवताना आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते. दयाची भूमिका साकारणाऱ्या दिशा वाकानीलादेखील खऱ्या आयुष्यात पतंग उडवायला खूप आवडते. ती पतंग उडवण्यात चांगलीच तरबेज आहे. पतंग कशाप्रकारे उडवायची याचे चांगलेच ज्ञान तिला आहे. याविषयी दिशा सांगते, "गुजरातमध्ये मकरसंक्राती हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गुजरातमध्ये या सणाला उत्तरायन असे म्हणतात. या सणाला गुजरातमध्ये सगळ्याच शहरात पतंग उडवले जातात. अहमदाबाद या शहरात तर पतंग उडवण्याची आतंराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धाच असते. माझे बालपण अहमदाबादलाच गेले असल्याने माझ्यासाठी हा सण खूपच महत्त्वाचा आहे. या सणाच्यावेळेच्या लहानपणीच्या माझ्या अनेक आठवणी आहेत. खरे तर फक्त मुलेच पतंग उडवतात असे म्हटले जाते. पण गुजरातमध्ये अनेक मुलीदेखील या खेळाचा आस्वाद घेतात. पतंग उडवणे ही एक प्रकारची कला असते. हवेचा जोर कोणत्या दिशेने आहे यावर पतंग उडवायची असते. पतंग उडवताना हवा नसेल तर पतंग योग्यप्रकारे उडत नाही आणि त्यात तुमचा हात खूप दुखतो. मी पतंग उडवण्यासोबतच लहानपणी पतंग बनवलीदेखील आहे. पण मी आता पतंग उडवत नाही. कारण पतंगाच्या मांज्यामुळे अनेक पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो असे माझे मत आहे."