Join us

​चित्रपटानंतर आता मालिकेतही मुंबईकर व्हर्सेस पुणेकर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 15:48 IST

हृता दुर्गुले आणि हर्षद आतकरी यांची प्रमुख भूमिका असलेली दुर्वा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दुर्वा ही ...

हृता दुर्गुले आणि हर्षद आतकरी यांची प्रमुख भूमिका असलेली दुर्वा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दुर्वा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेतील केशव आणि दुर्वा या पात्रांची केमिस्ट्री तर सगळ्यांनाच भावली होती. आता या मालिकेची जागा आम्ही दोघे राजाराणी ही मालिका घेणार आहे. मुंबई-पूणे-मुंबई या चित्रपटात मुंबईत राहाणारी मुलगी आणि पुण्यात राहाणारा मुलगा यांची प्रेमकथा पाहायला मिळाली होती. या मुंबईकर आणि पुणेकरांना आपापल्या शहारांविषयी असलेले प्रेमदेखील या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाले होते. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटाच्या यशानंतर मुंबई-पूणे-मुंबई 2 हा या चित्रपटाचा सिक्वलदेखील प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानेदेखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आणि आता आम्ही दोघे राजाराणी या मालिकेत प्रेक्षकांना मुंबई व्हर्सेस पुणे ही कथा परत एकदा पाहायला मिळणार असल्याचे कळतेय. या मालिकेत मंदार कुलकर्णी आणि दिप्ती लेले प्रमुख भूमिका साकारणार आहेत. मंदार आणि दिप्ती याआधीही छोट्या पडद्यावर झळकले आहेत. मंदारने तुमचे आमचे सेम असते या मालिकेत तर दिप्तीने लगोरी या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता पहिल्यांदाच ते दोघे एका मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. आम्ही दोघे राजाराणी या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेची कथा मुंबई व्हर्सेस पुणे असली तरी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे मंदार आणि दिप्ती दोघेदेखील पुणेकर आहेत. मुंबई आणि पुण्याची ही कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.