Join us  

घाडगे अँड सून मालिकेला मिळणार हे वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 6:41 PM

घाडगे अँड सून मालिकेने आता ५०० भागांचा पल्ला गाठला असून घाडगे सदन मध्ये अजून एक घटना घडणार आहे, ज्यामुळे अक्षय, अमृता आणि कियाराचे आयुष्य बदलणार आहे.

ठळक मुद्देघाडगे & सून मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाल्याच्या आनंदात सगळ्या टीमने सेटवर केक कापून, सेल्फी काढून आनंद साजरा केला.

कलर्स मराठीवरील घाडगे अँड सून ही मालिका सुरू झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. मालिकेने प्रेक्षकांना आपलेसे करून बघता बघता तब्बल ५०० भागांचा पल्ला गाठला आहे. याचबरोबर आता मालिकेमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच घटना बघायला मिळणार आहेत. घाडगे सदनमध्ये अक्कांच्या येण्याने माईंना बराच धीर मिळाला. तसेच अक्कांनी परत जाताना अक्षयला एक मोठं सत्य सांगितले, ज्यामुळे आता लवकरच अक्षय आणि कियाराचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. कियारा गरोदर नसल्याचे सत्य अक्षयला कळल्यामुळे तो पूर्णतः खचून गेला आहे. आता पुढे अक्षय कुठले पाऊल उचलेल? कियाराला अक्षय या गोष्टीचा जाब विचारू शकेल का? कियाराचे सत्य अक्षय घरच्यांना सांगू शकेल का? हे बघणे रंजक असणार आहे. मालिकेने आता ५०० भागांचा पल्ला गाठला असून घाडगे सदन मध्ये अजून एक घटना घडणार आहे, ज्यामुळे अक्षय, अमृता आणि कियाराचे आयुष्य बदलणार आहे... काय आहे ही घटना... हे प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच कळणार आहे.

घाडगे & सून मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाल्याच्या आनंदात सगळ्या टीमने सेटवर केक कापून, सेल्फी काढून आनंद साजरा केला. याबद्दल अक्षयची भूमिका साकारणारा चिन्मय उदगीरकर सांगतो, “घाडगे & सून मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले यावर खरोखरच विश्वास बसत नाहीये... असं वाटत आहे काल परवाच शूट सुरू झालं. ही मालिका करताना आम्हाला काय गवसलं तर प्रेक्षकांचं खूप प्रेम. माझ्याबाबतीत म्हणायचं झालं तर अक्षय ही भूमिका करताना मला खूप समाधान मिळत आहे. कारण मी आजवर ज्या भूमिका साकारल्या, त्यापेक्षा ही खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. प्रेक्षक आता मला अकी म्हणूनच हाक मारतात... इतकी ही भूमिका त्यांना आपलीशी वाटते. मला या मालिकेच्या रूपात एक दुसर कुटुंबच मिळाले आहे असे मी म्हणेन. एक गमंतीशीर गोष्ट मला अशी वाटते की, आमच्या सगळ्या टीममध्ये जे बॉन्डिंग पहिल्या दिवशी होतं तेच अजूनही आहे.”

टॅग्स :घाडगे अँड सूनचिन्मय उद्गगिरकर