Join us  

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'मध्ये नव्या अध्यायाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 6:30 AM

संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही मालिका कलर्स मराठीवर तुफान गाजते आहे.

ठळक मुद्दे मालिकेत बाळूमामांचं बालपण संपणार आहेमालिकेमध्ये आता नवा अध्याय सुरु होणार आहे

संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही मालिका कलर्स मराठीवर तुफान गाजते आहे. या मालिकेमुळे संत बाळूमामा हे आता केवळ दक्षिण महाराष्ट्राचं दैवत नव्हे तर तमाम महाराष्ट्राचं श्रध्दास्थान बनलं आहे. या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातली आणि अवघा महाराष्ट्र “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” या जयघोषाने दुमदुमला.

गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या या मालिकेतील बाल अवतारातील बाळूमामांना रसिकांनी देवत्व देण्याबरोबरच आपल्या घरातल्या लाडक्या व्यक्तीसारखं प्रेम केलं. म्हणूनच छोटे बाळूमामा हे महाराष्ट्रातील घराघरातलं लाडकं व्यक्तिमत्व बनलं. बाळूमामांबरोबरच त्यांना सतत आधार देणारी, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी त्याची आई सुंदरा, त्यांना सतत विरोध करणारा त्यांचा पिता मयप्पा, गावातील पंच, वैजयंता, कळलाव्या तात्या, महादू, देवप्पा, मंगळू, गंगी, सत्यवा ही पात्रं मालिकेतील पात्रं न रहाता प्रेक्षकांच्या घरातलीच पात्रं बनली आहेत.  आता मालिकेत बाळूमामांचं बालपण संपून ते मोठ्या रुपात अवतरणार आहेत. आपल्या अस्तित्वाने अकोळसारख्या छोट्या गावात आणि गावकऱ्यांमध्ये चैतन्य फुलवणारे बाळूमामा मालिकेत आता लवकरच मोठ्या रुपात दिसणार आहेत. बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमध्ये आता नवा अध्याय सुरु होणार असून यात बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना घडणार आहे. दिनदुबळ्यांचा कैवार घेणारे, गरीबांचे खरेखुरे प्रतिनिधित्व करणारे संत बाळूमामा यांची ही चरित्रगाथा एका नव्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. या महान संताची चरित्रगाथा “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” २० मे पासून आता आणखी रंजक स्वरुपात पहायला मिळणार आहे. 

टॅग्स :बाळूमामाच्या नावानं चांगभलंकलर्स मराठी