Join us  

‘नागीन 4’च्या अभिनेत्रीला चिंता EMIची...; लॉकडाऊनमुळे घर चालवायलाही नाहीत पैसे!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 11:44 AM

होय,  ही अभिनेत्री सुद्धा सध्या आर्थिक संकटाचा सामना करतेय. घर चालवायलाही ‘नागीन 4’च्या या अभिनेत्रीकडे पैसे नाहीत.

ठळक मुद्देज्या लोकांचे हातावर पोट आहे, त्यांच्या व्यथा मी समजू शकते. ही वेळ सर्वांसाठीच कठीण आहे, असे ती म्हणाली.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. याचा सर्वाधिक फटका हा हातावर पोट असणा-यांना बसला आहे. हाताला काम नसल्याने दोनवेळ पोट कसे भरायचे, असा प्रश्न  या सर्वांना पडला आहे. मनोरंजन विश्वातील अनेकांनाही हा प्रश्न सध्या छळतोय. मालिका, चित्रपटाचे शूटींग बंद आहे. परिणामी पैशाची आवकही थांबली आहे. काम बंद झाल्याने अनेक कलाकारांना आर्थिक अडवणींतून जावे लागतेय. ही अभिनेत्री सुद्धा सध्या आर्थिक संकटाचा सामना करतेय. तिचे नाव सायंतनी घोष. होय, घर चालवायलाही ‘नागीन 4’च्या या अभिनेत्रीकडे पैसे नाहीत.

टाइम्सला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत सायंतनी यावर बोलली. ती म्हणाली, ‘लॉकडाऊनमुळे आम्हा कलाकारांना सुद्धा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. लॉकडाऊन आहे, कोरोना आहे, त्यामुळे आम्ही कलाकार घरी आहोत. पण आता आम्हालाही  कामावर परतण्याची ओढ लागली आहे. लवकरच काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे, अर्थात पण हे सोपे नाही. सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्यातही सोशल डिस्टंसिंग सर्वात महत्त्वाचे आहे. पण सर्वांनाच पैशाची गरज आहे, हेही वास्तव आहे. माझे स्वत:चे उदाहरण द्यायचे तर अनेक ठिकाणाहून माझे पेमेंट येणे बाकी आहे. त्यांनी पैसे द्यायला नकार दिलेला नाही पण ते देणार कसे? सर्व ऑफिस बंद आहेत. सर्वांनाच वेगवेगळ्या अडचणी आहेत. आत्ता तर घर आणि कारचा इएमआय द्यायलाही माझ्याकडे पैसे नाही. सध्या सरकारने इएमआयमध्ये सूट दिली असली तरीही घर तर चालवावे लागतेच ना? आता ब-याच समस्यांचा सामना करावा लागतोय.’

यावेळी हातावर पोट असणा-यांबद्दल तिने सहानुभूती व्यक्त केली. ज्या लोकांचे हातावर पोट आहे, त्यांच्या व्यथा मी समजू शकते. ही वेळ सर्वांसाठीच कठीण आहे, असे ती म्हणाली.

सायंतनीने अनेक मालिकांमध्ये काम केलेय. कुमकुम-एक प्यारा सा बंधन, कॉमेडी सर्कस, घर एक सपना, संजीवनी 2, नागीन 4 अशा अनेक मालिकांमध्ये ती दिसली. काही बंगाली सिनेमांमध्येही तिने काम केलेय.

टॅग्स :टेलिव्हिजनकोरोना वायरस बातम्या