Join us  

प्रत्येकाच्या मनातला ' बापमाणूस ' रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 9:25 AM

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा माणूस असतो,ज्याच्यामुळे आपण स्वतःच्या आयुष्यात काहीतरी बनतो, या माणसाचे आपल्या आयुष्यातील स्थान एवढे महत्त्वाचे ...

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा माणूस असतो,ज्याच्यामुळे आपण स्वतःच्या आयुष्यात काहीतरी बनतो, या माणसाचे आपल्या आयुष्यातील स्थान एवढे महत्त्वाचे असते, की ज्यामुळे त्या माणसाबद्दलचा अभिमान उल्लेखनीय असतो.पण आपल्याला ते कोणाला कधीही सांगता येत नाही.त्यामुळेच अभिनेता सुयश टिळक याने #baapmanus हा हॅशटॅग वापरून प्रत्येकाच्या मनाला हात घालणारी एक चेन सोशल मीडिया वर काही दिवसांपूर्वी सुरु केली.यात त्याने आपल्या आयुष्यातील बापमाणूस सांगण्याबद्दल सोशल मीडियावर आवाहन केले आणि बघता बघता सुयशचे हे आवाहन लोकांच्या मनाला एवढं भिडलं की केवळ मराठी सृष्टीतील मोठमोठे सेलिब्रिटीजच नव्हे तर सुयशच्या असंख्य चाहत्यांनी आणि त्याशिवायही इतर अनेक लोकांनी त्यांच्या आयुष्यातील बापमाणसाबद्दल सोशल मीडियावर अतिशय अभिमानाने फोटो अपलोड केले आणि मित्रपरिवारासमोर त्यांच्या आयुष्यातील बापमाणसाला एक मानाचा मुजरा ही दिला.ही मोहीम खरं तर सुयश टिळकच्या झी युवावर येणाऱ्या ‘बापमाणूस 'या नव्या मालिकेसाठीच झाली होती.दिवस रात्र न थकता वादळ वाऱ्याची पर्वा न करता,प्रत्येक क्षणी आपल्या पाठीशी उभा असणारा ,आपल्या कुटुंबाचा रक्षणकर्ता , चंदनासारखा झिजून आपल्या कुटुंबावर मायेची पाखर धरणारा, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवताना प्रसंगी ओठी कठोर पण पोटी अमाप माया असणाऱ्या, प्रत्येक कुटुंबातील 'बापमाणसाची 'ही गोष्ट आपली छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.या मालिकेत बापमाणसाची मुख्य भूमिका साकारत आहेत आपल्या सर्वांचे आवडते आणि दिग्गज अभिनेते रवींद्र मंकणी. बापमाणूस या मालिकेद्वारे झी युवा कलाकारांची एक तगडी फौज घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या मालिकेत रवींद्र मंकणी, सुयश टिळक यांच्या सोबत पूजा पवार, पल्लवी पाटील ,अजय पुरकर, संग्राम समेळ, संजय कुलकर्णी,शिवराज वाळवेकर,नम्रता आवटे अशी जबरदस्त स्टारकास्ट आणि त्याच्याबरोबरच अभिजित श्वेतचंद्र ,ऐश्वर्या तुपे, अभिलाषा पाटील, आनंद प्रभू, श्रुती अत्रे,ज्योती पाटील, अमोल देशमुख आणि बालकलाकार मैथिली पटवर्धन प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.त्याचबरोबर झी युवाच्या अतिशय गाजलेल्या 'रुद्रम'' या मालिकेचे दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.त्यामुळे ही मालिका सुद्धा उत्कृष्ट दर्जाचीच असेल यात शंकाच नाही.बापमाणूस या मालिकेची कथा कोल्हापूरच्या रांगड्या मातीत घडताना दिसणार आहे. या कथेत कोल्हापुरातील एका अशा साध्या माणसाचा प्रवास दाखवला आहे जो त्याच्या कर्तृत्व आणि तत्त्वांमुळे त्याच्या कुटुंबाचाच नाही तर त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा बापमाणूस बनतो.कोल्हापुरातील त्याच्या स्थानाला मिळणारं महत्त्व आणि आदर त्याचबरोबर त्याची संपत्ती मिळवण्यासाठी त्याच्याच कुटुंबातील वाद आणि मतभेद यावर आधारित बापमाणूस ही मालिका आहे आणि ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.बापमाणूस या मालिकेची निर्मिती करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली ती म्हणजे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक बापमाणूस असतो जो आपल्या कुटुंबावर मायेची पाखर धरून असतो कुटुंबाला एकसंध ठेवण्यासाठी जीवाचं रान करत असतो. त्यामुळे ही मालिका जरी कोल्हापुरी बोलीभाषेतील असली तरीही त्यातील गोष्ट मात्र प्रत्येकाला अतिशय जवळची वाटेल. बापमाणूस या मालिकेची ही उत्कृष्ट गोष्ट, तेवढ्याच दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करेल अशी आशा मालिकेच्या टीमला आहे."