Join us  

MDHच्या जाहिरातीत कशी लागली होती धर्मपाल गुलाटी यांची वर्णी, इंटरेस्टिंग आहे किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 11:06 AM

देशातील प्रसिद्ध मसाला कंपनी महाशिया दी हट्टी(एमडीएच)चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे आज  निधन झाले. ते 98 वर्षांचे होते.

ठळक मुद्देगुलाटी यांचा जन्म 27 मार्च, 1923 मध्ये पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला होता. 1947 च्या फाळणीमध्ये ते भारतात आले होते.

देशातील प्रसिद्ध मसाला कंपनी महाशिया दी हट्टी(एमडीएच)चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे आज  निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. 98 वर्षांच्या गुलाटी यांचा चेहरा उद्योगविश्वात जितका लोकप्रिय होता, तितकाच टीव्हीवरही. एमडीएच मसाल्याच्या जाहिरातीतील त्यांचा चेहरा लोकांच्या ओळखीचा होता. पण या जाहिरातीत धर्मपाल यांची एन्ट्री कशी झाली होती, यामागची कहाणी कदाचित तुम्हाला ठाऊक नसावी.

तर आपल्याच उत्पादनाच्या जाहिरातीत त्यांना योगायोगाने संधी मिळाली होती. एका मुलाखतीत त्यांनी यामागचा किस्सा सांगितला होता. तर एमडीएच मसाल्याख्या जाहिरातीचे शूटींग सुरु होते. या जाहिरातीत वधूचा पिता म्हणून एका दुस-याच अभिनेत्याची निवड करण्यात आली होती. पण ऐनवेळी हा अभिनेता शूटींगला पोहोचू शकला नाही. मग काय, दिग्दर्शकाने धर्मपाल यांनाच गळ घातली. तुम्हीच वधूचे पिता बना, असे दिग्दर्शक म्हणाला. धर्मपाल यांनाही कल्पना आवडली. याचे सर्वात मोठे कारण काय तर  यामुळे आपले काही पैसे वाचतील, असा विचार त्यांनी केला. ते कॅमे-यासमोर उभे झालेत आणि एमडीएच जाहिरात पूर्ण झाली. यानंतरच्या एमडीएच या आपल्या मसाल्याच्या सर्वच जाहिरातीत धर्मपाल दिसले.

MDH मसालेचे संस्थापक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन; कोरोनानंतर हृदयविकाराचा झटका

गुलाटी यांचा जन्म 27 मार्च, 1923 मध्ये पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला होता. 1947 च्या फाळणीमध्ये ते भारतात आले होते. तेव्हा त्यांच्याकडे केवळ 1500 रुपये होते. भारतात आल्यावर त्यांनी उदरनिवार्हासाठी टांगा चालवायला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी पैसे जमवत दिल्लीच्या करोलबागमध्ये एक मसाल्याचे दुकान उघडले. या एका दुकानावरून त्यांनी देशाची प्रसिद्ध कंपनी उभी केली. आज त्यांच्या एमडीएच कंपनीच्या भारतातच नाही तर दुबईतदेखील फॅक्टरी आहेत. त्यांच्या एकूण १८ फॅक्टरी आहेत. याद्वारे ते जगभरात पोहोचले आहेत. एमडीएचची ६२ उत्पादने आहेत.