Join us  

इतकं अपमानास्पद कधीच...! या मराठी अभिनेत्रीवर करण्यात आला होता लिपस्टिक चोरीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 2:59 PM

त्या माझ्या सर्वात आवडत्या एकमेव लिपस्टिकमुळे माझी डायरेक्ट लायकी काढण्यात आली होती. इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं मला...., असं लिहितं तिनं एक कटु अनुभव शेअर केला आहे.

ठळक मुद्देइतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं मला....,’ असं लिहितं उर्मिलानं तो कटु प्रसंग नमूद केला आहे.

उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) दुहेरी ही मराठीची लोकप्रिय अभिनेत्री, तितकीच लोकप्रिय युट्यूबर. ‘दुहेरी’ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेल्या याच उर्मिलानं   इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं एक कटु अनुभव शेअर केला आहे. तो वाचून तुम्हालाही धक्का बसेल. होय, एका हिंदी मालिकेच्या सेटवर उर्मिलावर चोरीचा आळ घेण्यात आला होता. तो सुद्धा लिपस्टिक चोरल्याचा आळ.

घटना तशी जुनी आहे, पण हा प्रसंग शेअर करण्याचं निमित्त तूर्तास खास आहे. होय, करिअरच्या सुरुवातीस  ज्या कंपनीच्या लिपस्टिक चोरीचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. आज त्याच लिपस्टिक ब्रँडनं उर्मिलाला जाहिरातीसाठी विचारणा केली आहे.‘ त्या माझ्या सर्वात आवडत्या एकमेव लिपस्टिकमुळे माझी डायरेक्ट लायकी काढण्यात आली होती. इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं मला....,’ असं लिहितं उर्मिलानं तो कटु प्रसंग नमूद केला आहे. उर्मिला निंबाळकर ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असून विविध मालिकांमध्ये तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. दिया और बाती, मेरी आशिकी तुमसे ही या मालिकेत तिनं काम केलं आहे. उर्मिलाची छोट्या पडद्यावरील 'दुहेरी' ही मालिका चांगलीच गाजली होती.

ती लिहिते...

 तर झालं असं...एका मोठ्या हिंदी मालिकेच्या सेटवर, त्या मालिकेतील हिरोईनची मेकअप आणि हेअर ड्रायर ची बॅग चोरीला गेली. त्याचवेळेस पैसे साठवून मी @maccosmeticsindia ची एक लिपस्टिक विकत घेतली होती. तेवढी एकच लिपस्टिक अप्रतिम क्वालिटीची, ब्रँडेड आणि माझा ओठांना रॅश न येऊ देणारी असल्यामुळे मी प्रत्तेकच शुटिंगमधे ती वापरायचे. मराठी कलाकाराच्या पर डे पेक्षा मोठ्या किंमतीची लिपस्टिक माझ्या हातात दिसल्याने, माझ्यावर चोरीचा पहिला संशय घेण्यात आला. या प्रकरणात माझा काहीही संबंध नसल्याने, साहजिकच त्यांना मी माझी संपुर्ण बॅग चेक करु दिली. माझा मोठा भाऊ भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी म्हणून निवडला गेलेला असून, माझे वडिल व्याख्यान आणि प्रवचने करतात. माज्या कुटुंबातील प्रत्तेक पुरुष पिढ्यांपिढ्या शेती करतोय. कलेचा कसलाही वारसा नसलेल्या कुटुंबातील मी पहिलीच मुलगी आहे, जी एकटी २ बस आणि २ लोकल बदलून, मुंबईत प्रामाणिकपणे ऑडिशन पास करुन, सेटवरील एकमेव मराठी कलाकार असूनही वेगळ्या भाषेत काम करतीय. बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं होतं की मी चोर नाही. त्या माझ्या सर्वात आवडत्या एकमेव लिपस्टिकमुळे माझी डायरेक्ट लायकी काढण्यात आली होती. इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं मला.  परवा @maccosmeticsindia चा मला मेल आला, आम्हाला तुमच्या मराठी युट्यूब चॅनेलवर आमचं नविन प्रॉडक्ट पहिल्यांदा लॉंच करायचंय आणि आम्ही तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रेयेचे तुम्हाला पैसे देऊ! तुम्ही तुमच्या गोड मराठी भाषेतच बोला हा त्यांचा आग्रह होता. आपल्या आवडत्या ब्रँडबरोबर काम करुन पैसे मिळवण्याचा आनंद आहेच पण माझा हा प्रवास मलाच आनंदाचा अभिमानाचा वाटतो! 

टॅग्स :टेलिव्हिजन