Join us  

सहा वर्षांच्या नात्यानंतर हे कपल करतेय ब्रेकअप, झाला होता साखरपुडा देखील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 8:05 PM

कितने अजीब रिश्ते है यहाँ पे असे म्हणत मधुर भांडारकरने पेज ३ या त्याच्या चित्रपटात बॉलिवूडमधील नात्यांवर भाष्य केले होते.

ठळक मुद्देमानसी आणि मोहित यांचा ऑगस्ट २०१६ मध्ये साखरपुडा देखील झाला होता. मानसीने मुलाखतीत सांगितले आहे की, एकमेकांना समजून घेण्यात आम्ही दोघे कुठे तरी कमी पडत होतो. तसेच आयुष्याकडे पाहाण्याचा आमचा दोघांचा दृष्टिकोन देखील पूर्णपणे वेगळा होता.

कितने अजीब रिश्ते है यहाँ पे असे म्हणत मधुर भांडारकरने पेज ३ या त्याच्या चित्रपटात बॉलिवूडमधील नात्यांवर भाष्य केले होते. पण बॉलिवूडच नव्हे तर छोट्या पडद्यावरील अनेकजण देखील खुशालपणे आपले नाते तोडताना दिसत आहेत. छोट्या पडद्यावर प्रसिद्ध असलेली एक जोडी सहा वर्षांच्या नात्यानंतर आता वेगळी होणार आहे. 

इश्कबाज ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला मानसी श्रीवास्तवला पाहायला मिळाले होते. ती गेल्या सहा वर्षांपासून मोहित अबरोलसोबत नात्यात होती. मोहितने बालिकावधू, ये है आशिकी, प्यार को हो जाने दो, गंगा, कवच... काली शक्तियों से, पोरस यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तर मसान आणि एबीसीडी २ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या दोघांच्या नात्याविषयी सगळ्यांनाच कल्पना होती. पण आता त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मानसी आणि मोहित यांचा ऑगस्ट २०१६ मध्ये साखरपुडा देखील झाला होता. मानसीने बॉम्बे टाइम्सशी बोलताना त्यांनी ब्रेकअप केले असल्याचे सांगितले आहे. मानसीने मुलाखतीत सांगितले आहे की, एकमेकांना समजून घेण्यात आम्ही दोघे कुठे तरी कमी पडत होतो. तसेच आयुष्याकडे पाहाण्याचा आमचा दोघांचा दृष्टिकोन देखील पूर्णपणे वेगळा होता. मी आणि मोहितने आमच्या नात्याला अनेक संधी दिल्या. पण नाते उगाचच ताणण्यात काहीही अर्थ नसल्याचे आम्हाला जाणवले आणि आम्ही नाते इथेच संपवण्याचा निर्णय घेतला.

आम्ही दोघे मार्च २०१८ मध्ये लग्न देखील करणार होतो. पण आमच्या नात्याला थोडा वेळ देण्याची गरज आहे अशी आम्हाला जाणीव झाल्याने आम्ही त्यावेळी लग्न न करण्याचे ठरवले. त्याच्यासोबत घालवलेले सगळेच क्षण माझ्यासाठी खूप खास आहेत. मोहितसोबत मैत्री ठेवायला माझी काहीही हरकत नाहीये. कारण आम्ही दोघे एकत्र मोठे झालो आहोत. तसेच करियर बनवण्यासाठी देखील दिल्लीहून एकत्रच मुंबईत आलो होतो. त्यामुळे आमच्या दोघांसाठी देखील ही गोष्ट खूपच अवघड आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजन