Join us  

विनोदाचा डबल डोस! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आठवड्यातून पाच दिवस येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 2:58 PM

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत

सोनी मराठी वाहिनीवरचा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे.  या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. नुकतेच या कार्यक्रमाचे 500 भाग पूर्ण झाले. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी लाफ्टर थेरपीच बनला आहे. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोमवार, 25 एप्रिलपासून  सोम. ते शुक्र. रात्री 9 वाजता पाच दिवस  पाहता येणार आहे.

  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. समीर, प्रसाद, नम्रता, गौरव, वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे. लॉकडाऊनच्या कठीण काळातही हा कार्यक्रम रसिकांचे मनोरंजन करत होता. आणि आता आठवड्यातले पाच दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. उन्हाळ्याची सुट्टीही  सुरू झाल्याने आता  या धमाल विनोदी कार्यक्रमाचा आस्वाद सहकुटुंब घेता येणार आहे. टेन्शनवरची उत्तम मात्रा असणाऱ्या या कार्यक्रमात हास्याचे अनेक फवारे उडणार आहेत.

 अल्पावधीत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम आठवड्यातून पाच दिवस रसिकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातले कलाकारही आठवड्यातून पाच दिवस प्रेक्षकांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत.  

टॅग्स :महाजनादेश यात्रानम्रता आवटे संभेरावटिव्ही कलाकार