Join us

Life after KBC:केबीसीचा पहिला करोडपती हर्षवर्धन नवाथेची पत्नी आहे मराठमोळी अभिनेत्री,कोण आहे ती जाणून घ्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 12:23 IST

प्रत्येक व्यक्ती जीवनात यशस्वी होण्याचं स्वप्न पाहत असतो. आपल्या जीवनातील स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत असतो.मात्र प्रत्येकालाच त्याची ...

प्रत्येक व्यक्ती जीवनात यशस्वी होण्याचं स्वप्न पाहत असतो. आपल्या जीवनातील स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत असतो.मात्र प्रत्येकालाच त्याची स्वप्नं पूर्ण करता येतात असं नाही. मोजक्या मंडळींची स्वप्न साकार होतात. मात्र अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. महानायक आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचं नाव केबीसीशी नाव जोडलं गेलं. त्यामुळे या केबीसीला एक परिमाण लाभलं होतं. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत.यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. केबीसीमुळे जीवन पालटणा-यांमध्ये आवर्जून उल्लेख करावा लागले पहिलावहिला करोडपती म्हणजेच मराठमोळ्या हर्षवर्धन नवाथे. अवघ्या 23 मिनिटांत 15 प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन हर्षवर्धन रातोरात कोट्यधीश बनला. रातोरात हर्षवर्धनच जणू जीवनच पालटलं. पहिला करोडपती बनल्यानंतर हर्षवर्धन नवाथेचे अनेक सेलिब्रिटीही फॅन झाले. अभिनेता जॉन अब्राहम, क्रिकेटर सलील अंकोला त्याचे खास मित्र बनले. बॉलिवूड, राजकारणी यांच्यात हर्षवर्धन नवाथेची चर्चा होऊ लागली. मुंबईत रंगणा-या पार्ट्यांचं हर्षवर्धनला निमंत्रण येऊ लागलं. बॉलिवूडच्या पेज थ्री पार्ट्यांमध्ये सामील होण्यासाठी त्याला विचारणा होऊ लागली. जाहिराती आणि विविध शोसाठी हर्षवर्धनकडे ऑफर्स येऊ लागल्या. विविध पीआर कंपन्या आणि अनेक चॅनेल्सनी त्याच्याशी करार केला. करोडपती बनल्यानंतर आपलं जीवनच बदलून गेलं होतं असं हर्षवर्धन सांगतो. विविध शो, उदघाटन सोहळे, राजकीय कार्यक्रम, सभा यांमध्ये हजेरी लावल्याचंही त्यानं सांगितले आहे. प्रशासकीय सेवेत जाण्याचं हर्षवर्धनचं स्वप्न होतं.त्या दृष्टीने तयारी करता करता तो केबीसी शोमध्ये पोहचला आणि पहिला करोडपती बनला. करोडपती बनल्यानंतर मात्र हर्षवर्धनचे प्रशासकीय अधिकारी बनण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं. 2005 पासून हर्षवर्धन महिंद्रा एंड महिंद्रा या कंपनीत काम करत आहे. या कंपनीत तो सीएसआर एंड एथिक्स डिपार्टमेंटमध्ये प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. केबीसीमध्ये जिंकलेली रक्कम हर्षवर्धननं बँकेत जमा केली. यापैकी 30 लाख रुपये त्याला कर म्हणून द्यावा लागला. उर्वरित 70 लाखांपैकी 6 लाख रुपयांत त्याने आलिशान कार खरेदी केली. याच पैशातून त्यानं पुण्याच्या सिम्बॉयसिसमधून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. शिवाय पुढील शिक्षणासाठी तो लंडनला गेला. त्याचा खर्चही त्यानं याच पैशातून केला.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हर्षवर्धन 2007 साली रेशीमगाठीत अडकला.हर्षवर्धनचे 29 एप्रिल 2007 रोजी सारिका नीलत्करसोबत लग्न झाले. सारिका ही मराठी अभिनेत्री असून तिनं मराठी सिनेमा, टीव्ही मालिका आणि रंगभूमीवर काम केलं आहे. 'चाणक्य', 'जास्वंदी' या नाटकांत सारिकानं भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय दूरदर्शनवरील 'गुलाम-ए-मुस्तफा' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. 2012 मध्ये आलेल्या अजिंक्य या सिनेमातही सारिका झळकली होती. 'पहिली शेर दुसरी सवाशेर नवरा पावशेर' या सिनेमात सारिकाने अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबत काम केलं होतं. तर 2008मध्ये संदीप कुलकर्णींसह 'एक डाव संसाराचा' या सिनेमातही काम करण्याची संधी सारिकाला लाभली. सारिका आणि हर्षवर्धन यांचे लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज आहे. कुठल्याही फिल्मी पार्टीत त्यांची भेट झाली नव्हती. आईवडिलांनी निवडलेल्या मुलीसोबत हर्षवर्धन यांनी लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुलं असून एकाचं नाव सारांश तर दुस-याचं रेयांश असं आहे.