Join us  

‘लागीरं झालं जी’ फेम शिवानी बावकर मराठी दिनाच्या निमित्ताने करणार हा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 7:00 PM

शीतल म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर ही खऱ्या आयुष्यात मराठी, इंग्रजी भाषेसोबतच जर्मन भाषेत निपुण आहे. तिला भाषा शिकण्याची खूपच आवड असून तिने या मालिकेसाठी सातारच्या परिसरात बोलली जाणारी भाषा शिकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

ठळक मुद्देमाझं शिक्षण कॉन्व्हेन्ट मध्ये झालं असल्यामुळे शाळेत मराठीवर जास्त भर नव्हता. पण घरी मात्र मराठीतच बोलायचं असे मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला आमच्या पालकांनी सांगितल होतं.मी इंग्लिश पुस्तकं मोठ्या प्रमाणात वाचते. पण या मराठी दिनापासून मी मराठी पुस्तकही वाचायला सुरुवात करेन असे मी ठरवलं आहे

‘लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या दीड वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. तसेच या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल या व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील कुटुंबातील एक झाल्या आहेत. शीतल म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर ही खऱ्या आयुष्यात मराठी, इंग्रजी भाषेसोबतच जर्मन भाषेत निपुण आहे. तिला भाषा शिकण्याची खूपच आवड असून तिने या मालिकेसाठी सातारच्या परिसरात बोलली जाणारी भाषा शिकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

मराठी भाषा दिनानिमित्त शिवानीने आपल्या मातृभाषेविषयी तिचं मत व्यक्त केलं. मराठी भाषेविषयी बोलताना प्रेक्षकांची लाडकी शीतल म्हणजेच शिवानी बावकर सांगते, "मराठी माझी मातृभाषा असल्याचा मला अभिमान आहे. कारण आपली संस्कृती खूप जुनी आहे आणि अजूनही आपण ती बऱ्यापैकी जपली आहे. मुंबईत राहायचं तर मराठी भाषा आलीच पाहिजे या मताची मी आहे. कारण भाषेचा अभिमान हा सगळ्यांना असावा आणि आपण आपली भाषा सोडून नवीन भाषा शिकण्यापेक्षा आपल्या भाषेबरोबर दुसरी भाषा शिकावी. माझं शिक्षण कॉन्व्हेन्ट मध्ये झालं असल्यामुळे शाळेत मराठीवर जास्त भर नव्हता. पण घरी मात्र मराठीतच बोलायचं असे मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला आमच्या पालकांनी सांगितल होतं. अजूनही मराठीतले अवघड शब्द मी आईला फोन करून विचारते. मी इंग्लिश पुस्तकं मोठ्या प्रमाणात वाचते. पण या मराठी दिनापासून मी मराठी पुस्तकही वाचायला सुरुवात करेन असे मी ठरवलं आहे. ‘लागीरं झालं जी’ या मालिकेच्या निमित्ताने मी सातारी भाषा शिकले. ही भाषा मला खूप आवडली. अनेकवेळा शहरातील लोक गावाकडची भाषा बोलणाऱ्या लोकांना चिडवतात किंवा नावं ठेवतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण भाषा म्हणजे एकमेकांशी संवाद साधण्यासाठीचे एक माध्यम आहे. शुद्ध भाषा असं काहीही नसतं आणि कुठलीही भाषा ही भाषाच असते असे मला वाटते."

टॅग्स :लागिरं झालं जी